दोन दिवसांपासून बिबट्याचे रस्त्यावर ठाण
By Admin | Updated: February 16, 2015 01:11 IST2015-02-16T01:11:11+5:302015-02-16T01:11:11+5:30
मागील काही दिवसांमध्ये जिल्ह्यामध्ये बिबट्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे. त्या तुलनेमध्ये त्यांना आवश्यक असलेले जंगल कमी पडत आहे.

दोन दिवसांपासून बिबट्याचे रस्त्यावर ठाण
चंद्रपूर : मागील काही दिवसांमध्ये जिल्ह्यामध्ये बिबट्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे. त्या तुलनेमध्ये त्यांना आवश्यक असलेले जंगल कमी पडत आहे. परिणामी गावशेजारी बिबट्यासह अन्य वन्यप्राणी येत आहेत. यातून मानव-वन्यप्राणी संघर्षाच्या घटना नित्याच्याच झाल्या आहेत. शुक्रवार आणि शनिवारी सलग दोन दिवस मामला परिसरात दिवसाढवळ्या अगदी रस्त्यावर बिबट बसून होता. हा रस्त्यावरून नेहमीच नागरिकांना मार्गक्रमण करावे लागते. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे.
चंद्रपूर-मूल मार्गावरील लोहारा गावाजवळून जाणाऱ्या एका रस्त्यावर मामला, त्यापुढे वायगाव आदी गावे आहेत. सदर गावालगत घनदाट जंगलात आहे. यामुळे वन्यप्राण्यांचे मोठ्या प्रमाणात येथे वास्तव्य आहे. काही दिवसांपूर्वी वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झाला होता. त्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी चक्क वनअधिकाऱ्यांना वाघाने मारलेल्या महिलेचा मृतदेह असलेली बैलबंडी ओढायला लावली होती. त्यानंतर येथील वाघाला पिंजऱ्यात बंद करण्यात आले. आता पुन्हा बिबट्याने धुमाकूळ सुरु केला आहे. बिबट अगदी रस्त्यावर बसून राहत असल्याने जाणाऱ्या-येणाऱ्यांना मोठा प्र्रश्न पडला आहे. बिबट्याच्या भीतीमुळे नागरिक रस्त्याच्या दोन्ही बाजूला ताटकळत उभे राहत असल्याचे चित्र मागील दोन दिवसांपासून या रस्त्यावर बघायला मिळत आहे. विशेष म्हणजे, शासकीय कर्मचाऱ्यांनाही घरी जाण्याच्या वेळेत रस्त्यात बिबट्यामुळे अडकून पडावे लागत आहे. (नगर प्रतिनिधी)
दोन दिवसात दोन बिबट्याचा मृत्यू
चंद्रपूर जिल्हा जंगलासाठी प्रसिद्ध आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत १२० पेक्षा अधिक वाघांचे तथा मोठ्या प्रमाणात बिबट्याचे वास्तव्य आहे. वन्यप्राण्यांना बघण्यासाठी देशविदेशातील पर्यटक येथे येतात. मात्र सध्या बिबट्यांची संख्या झपाट्याने वाढली असून यामुळे नागरिकांना त्रास होऊ लागला आहे. विशेष म्हणजे, दोन दिवसांपूर्वी पोंभूर्णा तालुक्यातील डोंगळहळदी येथे एका बिबट्याचा विहिरीत पडून मृत्यू झाला. तर शनिवारी रात्री मूल तालुक्यातील सुशी दाबगाव परिसरातील एफडीसीएमच्या ५२६ कंपार्टमेंटमध्ये बिबट्याचा मृतदेह आढळला. त्याचा मृत्यू नैसर्गिक झाल्याचे समजते.
शक्तीनगरमध्ये बिबट्याचे दर्शन
वेकोलि परिसरात असलेल्या शक्तीनगर कॉलनी परिसरात दहा दिवसांपूर्वी दोन बिबट रात्री ११ च्या सुमारास आले. याबाबत माहिती मिळताच अनेकांनी शक्तीनगर कॉॅलनीकडे धाव घेतली. कॉलनी परिसरात बिबट आल्याने नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. कुत्र्यांच्या मागावर असलेले बिबटे आता गावासह शहराकडेही धाव घेत आहेत.
शहरी भागातही बिबट
चंद्रपूर शहराच्या अगदी लगत जंगल असल्याने अनेकवेळा जंगलशेजारील भागात बिबट दर्शन देत आहे.. मागील वर्षी बाबूपेठ परिसरातील जुनोना, हिंग्लाज भवानी वॉर्ड, इंदिरानगर परिसरात बिबट्या शिरल्याच्या घटना घडल्या होत्या. विशेष म्हणजे, येथून जववळच असलेल्या लोहारा गावामध्येही रात्रीच्या दरम्यान बिबट्याने दर्शन नित्याचेच झाले आहे.
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये मोठ्या संख्येने पर्यटक येतात. जिल्ह्यातीलही मोठ्या संख्येने नागरिक भेट देतात. मात्र ताडोबात जाणे खर्चिक असल्याने अनेकवेळा वन्यप्रेमी व नागरिक रात्रीच्या वेळी जुनोना, लोहारा, चिचपल्ली परिसरातील रस्त्यांवर चारचाकी वाहनांना फिरत असल्याची चर्चा आहे.
जीव गुदमरतोयं
जिल्ह्यात मागील काही वर्षांमध्ये वन्यप्राणी आणि मानव संघर्षांच्या घटना घडत आहेत. या घटनांवर आळा घालण्यासाठी अनेकवेळा बिबट, वाघांना बंदिस्त केले जाते. वनविभागाकडून बंदिस्त करण्यात आलेल्या या प्राण्यांना ज्या पिंजऱ्यामध्ये ठेवण्यात येते ते पिंजरे अगदीच लहान आकाराचे असल्याने त्यांना यापासून धोका निर्माण झाला आहे. आता वनविभागाने या प्राण्यांना ठेवण्यासाठी मोठ्या आकाराचे पिंजरे तयार करण्यासाठी पाऊल उचलले आहे.