मोगली-बबलीच्या रासलीलांनी वन पर्यटकांवर मोहिनी...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2022 13:42 IST2022-04-25T13:41:28+5:302022-04-25T13:42:58+5:30
या रासलीलाचे दर्शन पर्यटकांना होत असल्याने पर्यटक मंत्रमुग्ध होत आहेत.

मोगली-बबलीच्या रासलीलांनी वन पर्यटकांवर मोहिनी...
राजकुमार चुनारकर
चिमूर (चंद्रपूर) : जिल्ह्यात तापमानाने उच्चांक गाठला असला तरी ताडोबातील वाघांच्या भेटीला येणाऱ्या पर्यटकांची गर्दी मात्र कमी होत नाही तर दिवसागणिक वाढतच आहे. याला कारण म्हणजे ताडोबातील रामदेगी व निमढेला बफर झोन परिसरात वास्तव्यास असलेल्या मोगली व बबलीमुळे. या वाघ-वाघिणीची रासलीला एका पर्यटकाने कॅमेऱ्यात कैदही केली. त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झाला. ताडोबा जंगल वाघाच्या प्रजननासाठी अतिशय उपयुक्त असल्याचेच या व्हिडिओवरून दिसून आले.
देशासह जगात वाघांसाठी प्रसिद्ध असलेल्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पमध्ये वाघांची संख्या लक्षणीय आहे. तसेच ताडोबा जंगलातील वातावरण वाघाच्या प्रजननासाठी पोषक व सुरक्षित आहे. उन्हाळ्याचे दिवस म्हणजे वाघांचा प्रजनन काळ या जंगलात माया,जुनाबाई, बबली,झरणी या वाघिणीसह मटकासुर, छोटा मटका, मोगली, रुद्रा या वाघांचे वास्तव्य आहे, तर सध्या वाघाचा प्रजननकाळ असल्याने त्यांच्या रासलीला सुरू आहेत. या रासलीलाचे दर्शन पर्यटकांना होत असल्याने पर्यटक मंत्रमुग्ध होत आहेत.
ताडोबातील रामदेगी, निमढेला बफर झोन परिसरात मोगली व बबली या जोडीच्या रासलीला सुरू असतानाच पर्यटक तिथे आले. ही रासलीला प्रत्यक्ष बघत पर्यटकांनी मोबाइलमध्ये त्याचा व्हिडिओ देखील काढला. आणि सोशल मीडियावर वायरल केला. या व्हिडिओमुळे पर्यटकांचा ओढा आता रामदेगी, निमढेला बफरझोन परिसरात वाढला आहे.