'त्या' पाच सावकारांना पोलिस कोठडी ! पीडित शेतकऱ्याची डाव्या बाजूची किडनी काढण्यात आल्याचे सोनोग्राफीतून उघड
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 17:06 IST2025-12-18T17:04:28+5:302025-12-18T17:06:44+5:30
Chandrapur : नागभीड तालुक्यातील मिथूर येथील रोशन कुळे या शेतकऱ्याला अवैध सावकारांनी एक लाख रुपयांचा आकडा अव्वाच्या सव्वा व्याजासह ७४ लाखांपर्यंत नेला.

'Those' five moneylenders in police custody! Sonography reveals that the victim farmer's left kidney was removed
लोकमत न्यूज नेटवर्क
नागभीड / ब्रह्मपुरी (जि. चंद्रपूर) : नागभीड तालुक्यातील मिथूर येथील रोशन कुळे या शेतकऱ्याला अवैध सावकारांनी एक लाख रुपयांचा आकडा अव्वाच्या सव्वा व्याजासह ७४ लाखांपर्यंत नेला. यामुळे पीडित शेतकऱ्याला चक्क किडनी विकावी लागली. याप्रकरणातील पाच आरोपींना बुधवारी (दि. १७) ब्रह्मपुरी येथील न्यायालयाने २० डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी ठोठावली. तर पीडित शेतकरी रोशन कुळे (३५) यांनी किडनी विकल्याचा दावा केल्याने त्यांची चंद्रपूर येथील शासकीय रुग्णालयात सोनोग्राफी करण्यात आली. अहवालातून डाव्या बाजूची किडनी काढण्यात आल्याचे वैद्यकीय अहवालातून उघड झाले आहे.
यामुळे आता पोलिस किडनी रॅकेटचा पर्दाफाश करण्याच्या दृष्टीने तपास करण्याची शक्यता आहे. किशोर रामभाऊ बावणकुळे, लक्ष्मण पुंडलिक उरकुडे, प्रदीप बावणकुळे, संजय विठोबा बल्लारपुरे व सत्यवान बोरकर यांनी न्यायालयात हजर करण्यात आले. मनीष पुरुषोत्तम घाटबांधे या आरोपीला अद्याप अटक करण्यात आली नसून त्याचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
रोशन कुळे या शेतकऱ्याला ब्रह्मपुरीतील सहा अवैध सावकारांनी एक लाखाच्या कर्जासाठी व्याजाच्या नावावर लुबाडणूक केली. इतकेच नव्हे, तर पैशासाठी अश्लील शिवीगाळ, मारहाणीसह अमानुष क्रूर कृत्य करण्यात आले. २१ मार्च २०२१ पासून हा प्रकार सुरू होता.
सावकारांच्या वाढत्या तगाद्याला कंटाळून दुचाकी, ट्रॅक्टर, साडेतीन एकर शेतीही विकली. यानंतर सावकारांकडून ४० ते ६० टक्क्यांपर्यंत व्याजाची रक्कम आकारण्यात आली. एवढी रक्कम कशी परतफेड करायची, या विवंचनेत असताना किडनी विकण्याचा निर्णय घेतला आणि कंबोडिया देशातील नानपेन शहरात आठ लाखांमध्ये डाव्या बाजूची किडनी विकली.
हा धक्कादायक प्रकार पुढे येताच राज्यभरात खळबळ उडाली. अधिक तपास ब्रह्मपुरी पोलिस करीत आहेत. चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रोशन कुळे या पीडित शेतकऱ्याची सोनोग्राफी करण्यात आली असता, डाव्या बाजूची किडनी काढण्यात आल्याचे पुढे आले आहे. या दिशेने आता तपास करण्यात येईल, असे पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी सांगितले.