Students are getting nutritious food at home | विद्यार्थ्यांना घरीच मिळत आहे पोषण आहार

विद्यार्थ्यांना घरीच मिळत आहे पोषण आहार

ठळक मुद्देकोरोना संसर्गाचा परिणाम : बंदीतही विद्यार्थ्यांचे होणार पोषण

लोकमत न्यूज नेटवर्क
चिमूर : शालेय पोषण आहार योजनेंतर्गत ग्रामीण भागातील शाळांमध्ये शिल्लक असलेला तांदूळ, डाळ, कडधान्य विद्यार्थ्यांना थेट वितरित करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यामुळे जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळत आहे.
याबाबत नुकतेच शासनाने परिपत्रक काढले आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून महाराष्ट्र राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका व नगरपंचायत क्षेत्रातील सर्व सरकारी व खासगी शाळा साथरोग प्रतिबंधात्मक कायदा, १८९७ अन्वये निर्गमित करण्यात आलेली अधिसूचना व नियमावलीतील तरतुदीनुसार सक्षम प्राधिकाऱ्याच्या मान्यतेने ३१ मार्च २०२० पर्यंत बंद ठेवण्याबाबत शासनाने पत्रान्वये सूचित करण्यात आले आहे. तसेच, कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी १४ एप्रिल २०२० पर्यंत संपूर्ण लॉकडाऊनचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे.
कोरोना विषाणू (कोविड-१९) चा होणारा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शाळा व अंगणवाडी बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थी व लहान बालके पोषण आहारापासून वंचित राहत असल्याबाबत सर्वोच्च न्यायालय, दिल्ली येथे सुमोटो रिट याचिका दाखल झाली आहे. उक्त याचिकेच्या अनुषंगाने १८ मार्च रोजीच्या सुनावणीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेले निर्देश आणि याबाबत केंद्र शासनाकडून घेण्यात आलेले मार्गदर्शन विचारात घेता राज्यातील विद्यार्थ्यांचे पोषण होण्याच्या दृष्टीने आहार देणे आवश्यक आहे, असे या परिपत्रकात म्हटले आहे. ग्रामीण भागातील शाळा स्तरावर शिल्लक असलेला तांदूळ व डाळ, कडधान्याचे विद्यार्थ्यांना तसेच हंगामी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना वितरित करण्याकरिता निर्देश देण्यात येत आहेत.
तांदूळ व डाळी, कडधान्य वाटप करतेवेळी जिल्हाधिकारी यांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता घ्यावयाच्या खबरदारीबाबत दिलेले आदेश व सूचनांचे कोणत्याही प्रकारे उल्लंघन होणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसेच वाटपाच्या अनुषंगाने आवश्यक निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिक स्तरावर शाळा व्यवस्थापन समितीला देण्यात येत आहेत, असे या परिपत्रकात म्हटले आहे.

गर्दी होणार नाही याची दक्षता
तांदूळ व डाळी, कडधान्य वस्तू नेण्यासाठी शाळास्तरावर गर्दी होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या अनुषंगाने शाळेतील विद्यार्थी, त्यांचे पालक यांना टप्याटप्याने शाळेमध्ये बोलवावे. तांदूळ व डाळी, कडधान्य इत्यादी वस्तूचे वाटप करावे. उपस्थित असणारे विद्यार्थी, पालक यांना एकमेकापासून रांगेत एक मीटर अंतरावर उभे करावे. विद्यार्थी अथवा पालक आजारी असल्यास अशा विद्यार्थ्यांचे तांदूळ व डाळी, कडधान्य घरपोच करण्याचे नियोजन करावे, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.

शिक्षकांवर जबाबदारी
शाळेचे मुख्याध्यापक, योजनेचे काम पाहणारे शिक्षक व शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांवर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तांदूळ व डाळी, कडधान्यांचा शिल्लक साठा विद्यार्थ्यांना तसेच हंगामी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना समप्रमाणात वाटपाचे नियोजन करावे. विद्यार्थ्यांना तांदूळ व डाळी, कडधान्य वाटपाबाबत शाळास्तरावरून प्रसिध्दी करण्यात यावी, अशा सूचना त्यांना देण्यात आल्या आहेत.

Web Title: Students are getting nutritious food at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.