शासनाच्या योजना सामान्यांपर्यंत पोहोचवा

By Admin | Updated: February 28, 2016 01:09 IST2016-02-28T01:09:09+5:302016-02-28T01:09:09+5:30

शासनाच्या अनेक कल्याणकारी योजना आहेत, सर्वसामान्य नागरिकांना डोळयासमोर ठेवून सुरु करण्यात आलेल्या ...

Spend government schemes to the common man | शासनाच्या योजना सामान्यांपर्यंत पोहोचवा

शासनाच्या योजना सामान्यांपर्यंत पोहोचवा

सुधीर मुनगंटीवार : सामाजिक न्यायच्या योजनांबाबत मार्गदर्शन कार्यशाळा
चंद्रपूर : शासनाच्या अनेक कल्याणकारी योजना आहेत, सर्वसामान्य नागरिकांना डोळयासमोर ठेवून सुरु करण्यात आलेल्या या योजना प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत पोहचल्या पाहिजे, असे प्रतिपादन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाच्या वतीने कन्यका परमेश्वरी देवस्थानच्या सभागृहात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम व समाज कल्याण विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती व जमाती आयोगाचे अध्यक्ष सी.एल. थूल उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद अध्यक्षा संध्या गुरुनुले, उपाध्यक्षा कल्पना बोरकर, जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती देवराव भोंगळे, जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, समाज कल्याण सभापती निलकंठ कोरांगे, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त प्रसाद कुळकर्णी, समाज कल्याण अधिकारी पुष्पलता आत्राम आदी उपस्थित होते. अजूनही अनेक जण हलाखीचे जीवन जगत असल्याचे आढळून येते. अशांना जगण्याच्या चांगल्या संधी उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी घटनेतील मार्गदर्शक सूचनेनुसार शासनाची आहे. त्यामुळेच शासन विविध प्रकारच्या योजना राबवीत असते, असे असले तरी अजूनही या योजना सर्वसामान्यापर्यंत पोहचलेल्या नाहीत. ज्या ज्या समाजासाठी योजना तयार करण्यात आल्या आहेत, त्या त्या समाजातील प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहचली पाहिजे व त्यासाठी चांगले नियोजन केले पाहिजे, असे ना. मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले.
राज्य शासनाने गेल्या काही दिवसात अनेक चांगले निर्णय घेतले, इंदू मिलच्या जागेचा प्रश्न सोडविला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक या ठिकाणी उभे राहणार आहे. हे स्मारक कायम समाजाला प्रेरणा देत राहील. माता रमाईच्या गावाचासुध्दा विकास केला जाणार असून हे गांव आदर्श बनविले जाणार आहे. लंडन येथे बाबासाहेब आंबेडकरांची राहती वास्तु शासनाने घेतली आहे. बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श घेऊन प्रत्येकाने सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी कार्यरत राहिले पाहिजे. शासनात काम करणाऱ्या प्रत्येकाने आपण सामान्यांसाठी आहोत, याची जाणीव ठेवून काम करावे, असे ते म्हणाले.
यावेळी विद्यार्थी, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते तथा नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन कल्पना बनसोड यांनी केले तर आभार समाज कल्याण अधिकारी पुष्पलता आत्राम यांनी मानले. कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे कर्मचारी व नागरिकांची उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Spend government schemes to the common man

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.