चंद्रपूर: महिला वनाधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणात, चंद्रपूर शहरात स्थानिक इको-प्रो संस्थेच्या इको-प्रो महिला मंचकडून घटनेचा निषेध करीत मूक निदर्शने करण्यात आली. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी करण्यात आली.
मेळघाटमधील गुगामल वन्यजीव विभाग अंतर्गत येणाऱ्या हरिसाल वनपरिक्षेत्राच्या तरुण महिला अधिकारी दीपाली चव्हाण यांनी स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केली आहे. या घटनेत समोर आलेल्या सुसाईड नोटमध्ये वरिष्ठ वनाधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे म्हटले आहे. यासोबतच वरिष्ठांकडून मिळत असलेल्या अपमानजनक वागणुकीचा पाढाच वाचलेला आहे. या सुसाईड नोट आणि संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी उच्चस्तरीय समितीकडून करण्याची मागणी इको-प्रो महिला मंचने केली आहे. मूक निदर्शनेमध्ये योजना धोतरे, मनिषा जयस्वाल, प्रगती मार्कन्डवार, भारती शिंदे, नीता रामटेके, अंजली अडगूरवार, मोनाली बुरडकर, कोमल राऊत आदी सहभागी झाल्या होत्या. यावेळी इको-प्रो चे पदाधिकारी बंडू धोतरे, नितीन बुरडकर, राजू काहिलकर, अनिल अडगूरवार, आकाश घोडमारे, हेमंत बुरडकर सहभागी झाले होते.