इव्हीएम फोडणाऱ्या युवकाविरुद्ध गंभीर गुन्हे, आरोपीला दोन दिवस कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 15:00 IST2025-12-04T14:55:56+5:302025-12-04T15:00:46+5:30
Chandrapur : विवेक मल्लेश दुर्गे विरोधात विविध कलमांखाली गुन्हे

Serious charges against youth who broke EVM, accused remanded in custody for two days
लोकमत न्यूज नेटवर्क
कोरपना (चंद्रपूर) : गडचांदूर नगरपरिषदेच्या मतदानादरम्यान मतदान यंत्र फोडणारा आरोपी विवेक मल्लेश दुर्गे (३९) याच्या विरोधात पोलिसांनी एकाच वेळी विविध कलमांखाली गुन्हे दाखल केले. पोलिसांनी मंगळवारी (दि. २) त्याला अटक केली होती. बुधवारी (दि. ३) कोरपना न्यायालयात हजर केले असता त्याला एक दिवसाची गुरुवारी (दि. ४) पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
गडचांदूर येथील प्रभाग ९ मधील च्या मतदार केंद्रात 'नगारा' चिन्हासमोरील बटन दाबताच 'कमळ' चिन्हासमोरील दिवा लागत असल्याचा आरोप करून विवेक दुर्गे याने मतदान केंद्रातच मतदान यंत्र फोडला होता. गडचांदूर पोलिसांनी त्याच्या विरोधात विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. कलम १३२, ३२४ (४), ३५१ (२), २२३ (अ) सह लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१ मधील कलम १३१ (२), १३२ (१), १३५ (सी) १, १३६ (१) तसेच सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक अधिनियम १९८४ चे कलम ३ (१), सदर कलमे लागू होण्यामागे मतदान प्रक्रियेतील अडथळा, ईव्हीएम मशीनचे नुकसान, अधिकाऱ्यांच्या कामात विघ्न निर्माण करणे तसेच सार्वजनिक संपत्तीचे नुकसान इत्यादींचा समावेश आहे. पोलिसांनी आज आरोपीला कोरपना न्यायालयात हजर केले असता एक दिवसांची गुरुवारी (दि. ४) पोलिस कोठडी सुनावण्यात आली. गडचांदूर पोलिस तपास करीत आहेत.
समर्थकांची रात्री १२:३० पर्यंत ठाण्यासमोर निदर्शने
आरोपी विवेक मल्लेश दुर्गे याला अटक केल्यानंतर समर्थकांनी मंगळवारी रात्री १२:३० पर्यंत पोलिस ठाण्यासमोर निदर्शने केली होती. आरोपीची सुटका करण्याची मागणी लावून धरली. मात्र, कायदेशीर कारवाई करणे अत्यावश्यक असल्याचे पोलिसांनी समजावून सांगितल्यानंतर जमाव शांत झाला.
आधीच दिला होता ईव्हीएम फोडण्याचा इशारा ?
- आरोपी विवेक दुर्गे याने १६ नोव्हेंबर आपल्या फेसबूक अकाऊंटवर एक पोस्ट टाकली होती. यामध्ये त्याने मतदान यंत्र फोडणार असल्याचा उल्लेख केला होता.
- यामध्ये त्याने त्या पोस्टमध्ये 'गडचांदूर नगर निवडणुकीत ईव्हीएम मशीन फोडणार आहे. कारण ईव्हीएम मशीन चोर आहे आणि चुनाव आयोग चोरांचा सरदार आहे' अशी चर्चा आहे.
- याबाबत सायबर पोलिस तपास करीत असल्याचे समजते. तसेच घटनेच्या दिवशीही तो ईव्हीएम फोडण्याची भाषा करीत असल्याचेही बोलले जात आहे.