‘त्या’ वाघाला तत्काळ जेरबंद करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:34 IST2021-09-10T04:34:54+5:302021-09-10T04:34:54+5:30
सावली : सावली तालुक्यातील गेवरा खुर्द, बोरमाळा परिसरात गेल्या चार महिन्यांपासून नरभक्षक वाघाने हाहाकार माजवला असून, अनेक शेतकऱ्यांना ठार ...

‘त्या’ वाघाला तत्काळ जेरबंद करा
सावली : सावली तालुक्यातील गेवरा खुर्द, बोरमाळा परिसरात गेल्या चार महिन्यांपासून नरभक्षक वाघाने हाहाकार माजवला असून, अनेक शेतकऱ्यांना ठार केले आहे. काही महिला व पुरुष वाघाच्या हल्ल्यात जखमी झाले आहेत. या परिसरात दहा ते १२ वाघांचा वावर असून, वाघाच्या दहशतीमुळे शेतकऱ्यांना शेतात जाणेही कठीण झाले आहे. याची गंभीर दखल घेत त्वरित उपाययोजना करून सदर नरभक्षक वाघास जेरबंद करण्याचे निर्देश खासदार अशोक नेते यांनी चंद्रपूरचे मुख्य वनसंरक्षक प्रवीण कुमार यांना दिले.
गुरुवारी गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांनी सावली तालुक्यातील गेवरा खुर्द, गेवरा बुज, बोरमाळा परिसराचा दौरा केला. यावेळी सावली तालुकाध्यक्ष अविनाश पाल, तालुका महामंत्री सतीश बोम्मावार, माजी सभापती तुकाराम पाटील टिकरे, युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष विनोद धोटे, पाथरीचे युवा नेते शरद सोनवाणे, सावलीचे वनपरिक्षेत्राधिकारी कांबळे, गेवराचे सरपंच उषाताई आभारे, वासुदेव चनावार उपस्थित होते.
यावेळी गेवरा खुर्द येथील वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या शालिकराम माणिकराम चाफले (५३) यांच्या कुटुंबीयांना व गेवरा बुज येथील वाघाच्या हल्ल्यात जखमी शकुंतला दिवाकर चौधरी यांना खासदार अशोक नेते यांच्या हस्ते पाच हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. जखमी व ठार झालेल्यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून तातडीने आर्थिक मदत मिळवून देण्याच्या सूचना खासदार अशोक नेते यांनी वनपरिक्षेत्राधिकारी कांबळे यांना दिल्या.
090921\img-20210909-wa0191.jpg
मृतकांच्या कुटुंबियांना मदत करताना खा. अशोक नेते