चंद्रपुरातील अनेक खाणींमध्ये नियम डावलून काढला जातो आहे कोळसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 10:17 IST2017-12-02T10:13:46+5:302017-12-02T10:17:03+5:30
वेस्टर्न कोलफील्डस् लिमिटेडच्या माजरी क्षेत्रातील जुना कोनाडा ही कोळशाची ओपनकास्ट खाण ढासळल्यामुळे खाण सुरक्षेबद्दल मोठे प्रश्नचिन्ह उभे झाले आहे.

चंद्रपुरातील अनेक खाणींमध्ये नियम डावलून काढला जातो आहे कोळसा
आॅनलाईन लोकमत
नागपूर : वेस्टर्न कोलफील्डस् लिमिटेडच्या माजरी क्षेत्रातील जुना कोनाडा ही कोळशाची ओपनकास्ट खाण ढासळल्यामुळे खाण सुरक्षेबद्दल मोठे प्रश्नचिन्ह उभे झाले आहे.
कुठल्याही खाणीचा आधी जियोलॉजिकल सर्व्हे आॅफ इंडियातर्फे अहवाल तयार केला जातो. या अहवालात भूपृष्ठापासून किती खोलीवर कोळशाचे साठे आहेत व मध्ये कुठल्या प्रकारची माती, मुरुम, खडक, पाणी आहे (ओव्हरबर्डन) याची माहिती असते.
या जियोलॉजिकल रिपोर्टनुसार सेंट्रल माईन प्लॅनिंग अॅन्ड डिझाईन इन्स्टिट्यूट (सीएमपीडीआय) माईन प्लॅन बनवते. त्यात ओपनकास्ट खाणीचे क्षेत्रफळ किती राहील व कोळशाच्या साठ्यापर्यंत पोहचण्यासाठी खाणीच्या काठाकाठाने किती फुटाचा रस्ता राहील व तो किती टप्प्यात (बेंच) राहील याचे योजनाबद्ध विवरण असते. खोदकाम करणाºया कंपनीला म्हणजे वेकोलिला हा माईन प्लॅन काटेकोरपणे पाळावा लागतो व तो पाळण्याची जबाबदारी वेकोलिचे एरिया मॅनेजर व माईन मॅनेजर यांची असते.
जुना कुनाडा खाणीचे ओव्हरबर्डन रिमुव्हलचा ठेका धनसार इंजीनियरिंग प्रायव्हेट लिमिटेडला मिळाला आहे. या खाणीत ५०० मीटर (अर्धा किलोमीटर) लांबीचे दोन टप्पे (बेंचेस) ढासळले आहेत. धनसार इंजीनिअरिंगच्या ए.यू. पांडे यांनी सर्व काम माईन प्लॅनप्रमाणे केल्याचा दावा केला असला तरी ठेकेदाराने माईन प्लॅनचे उल्लंघन केल्याचे सकृतदर्शनी दिसत आहे त्यामुळे धनसार इंजीनिअरिंगची उच्चस्तरीय चौकशी होणे आवश्यक आहे.
वेकोलिला कोळसा उत्खनन करताना सेंट्रल माईन प्लानिंग अॅन्ड डिझाईन आॅथरिटी आॅफ इंडियाकडून (सीएमपीडीआय) रीतसर मंजुरी घेऊन त्यांनी आखून दिलेल्या गाईडलाईनप्रमाणेच काम करावे लागते. मात्र शुक्रवारी ज्या कुनाडा कोळसा खाणीत मातीचा महाकाय ढिगारा कोसळून मोठा अपघात घडला, तिथे सीएमपीडीआयचे सर्व नियम पायदळी तुडविले जात असल्याची बाब आता समोर येत आहे.
सेंट्रल माईन प्लानिंग अॅन्ड डिझाईन आॅथरिटी आॅफ इंडिया ही संस्था वेकोलिला दिशानिर्देश करीत असते. कोळसा उत्खनन करताना या संस्थेकडून नियमाप्रमाणे मंजुरी घ्यावी लागते. मंजुरी देताना सीएमपीडीआय वेकोलिला किंवा संबंधित कंत्राटी कंपनीला कोळसा उत्खननासाठी एक आराखडा तयार करून देते. त्या आराखड्यानुसारच खाणीतून कोळसा काढला जाणे अपेक्षित असते. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ही बाब अत्यंत महत्त्वाची असते. मात्र माजरीच्या जुना कुनाडा कोळसा खाणीत सीएमपीडीआयचे दिशानिर्देश धाब्यावर बसवत कोळसा काढला जात होता. ओव्हरबर्डन कमी करण्यासाठी वेकोलिकडून अतिरिक्त पैसे दिले जात असल्याने या खाणीत धनसार कंपनीकडून महाकाय ओव्हरबर्डन निर्माण केले जात असल्याचीही शक्यता आहे. याच कारणामुळे खाणीतून खोलातील माती मोठ्या प्रमाणात काढली जात होती, या शंकेलाही वाव आहे.
एकूणच या खाणीतील घटना केवळ चुकीमुळे घडली, हे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता दोषी कोण, असा प्रश्न निर्माण होताच वेकोलिचे अधिकारी व कंत्राटी धनसार कंपनीच्या अधिकाऱ्यांनी एकमेकांकडे बोट दाखविणे सुरू केले आहे. वेकोलिचे उपक्षेत्रीय प्रबंधक पंकजकुमार यांनी या संदर्भात बोलताना माती व कोळसा काढण्याचे काम धनसार कंपनीला दिले आहे. त्यांनी व्यवस्थित बेंचेच बनवून सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करायला हव्या होत्या. त्यांचीच काहीतरी चूक झाली आहे, असे सांगितले. तर धनसार इंजिनिअर प्रायव्हेट कंपनीचे व्यवस्थापक आर. यू. पांडे यांनी मातीचा ढिगारा कोसळल्याच्या घटनेला वेकोलिचे अधिकारीच जबाबदार असल्याचे म्हटले आहे. खाणीत ब्लास्टिंग करण्याचे काम वेकोलिचे आहे. चार दिवसांपासून मातीचा ढिगारा हळूहळू कोसळत होता. याची माहिती मुख्य महाप्रबंधक, खाण प्रबंधक, सुरक्षा अधिकारी यांना देण्यात आली होती. मात्र त्यांनी याकडे दुर्लक्ष केले, असे पांडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
माजरीचे महाप्रबंधक एम.एलय्या यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत अधिक काही बोलण्यास नकार दिला. केवळ घटनेतून सर्व कामगार बचावले आहेत, एवढीच माहिती देऊन आपले हात झटकण्याचा प्रयत्न केला.
ओव्हरबर्डन व ठेकेदार
कोळशाच्या साठ्यापर्यंत पोहचण्यासाठी माती, मुरुम, खडक इत्यादी खाणीच्या बाहेर काढावे लागतात. त्याला ओव्हरबर्डन रिमुव्हल म्हणतात. हे काम खासगी ठेकेदार करतात व त्यापोटी त्यांना दर टनामागे पैसे मिळतात. त्यामुळे जास्तीत जास्त ओव्हरबर्डन काढण्याकडे ठेकेदारांची धाव असते व त्यासाठी ते माईन प्लॅनचे उल्लंघन करून जास्त खोदकाम करतात. याला वेकोलि अधिकाऱ्यांचीही साथ असते. ठेकेदारांच्या या उपदव्यापांमुळे बहुतेक खाणी असुरक्षित झाल्या आहेत.