दरोडा प्रकरण : पैसे कुठून आले याचा तपास करणार आयकर विभाग?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2021 13:37 IST2021-11-21T13:06:22+5:302021-11-21T13:37:56+5:30
नाजनीन हारून कोळसावाला यांच्या घरी पिस्तूलीचा धाकावर दरोडा टाकणाऱ्या ५ जणांना रामनगर गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. व त्यांच्याकडून चक्क १ कोटी ७३ लाख ५० हजार रोख रक्कम व चोरीत वापरलेल्या दोन कार ताब्यात घेतल्या.

दरोडा प्रकरण : पैसे कुठून आले याचा तपास करणार आयकर विभाग?
चंद्रपूर : शहरातील मूल मार्गावरील अरविंदनगरात नाजनीन हारुन कोळसावाला यांच्या घरी १७ नोव्हेंबर रोजी पाच जणांनी दरोडा टाकून एक कोटी ७३ लाख ५० हजार रुपये पळविले होते. रामनगर पोलिसांनी १५ तासांत हा दरोडा उघड करीत तीन जणांसह एक विधिसंषर्घग्रस्त बालकाला ताब्यात घेतले. कोळसावाला यांनी शेती खरेदी करण्यासाठी आपल्या नातेवाइक व मित्रांकडून पैसे जमा केले असल्याची माहिती पोलिसांना दिली आहे; पण एवढी रक्कम कुठून आली, याचा तपास आयकर विभाग करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
नाजनीन कोळसावाला हे अंडे व कन्फेक्शनरीचे मोठे व्यापारी आहेत. बुधवारी ते कामानिमित्त बाहेर गेले होते. कोळसावाले जमीन खरेदी करण्यासाठी सहा करोड रुपये जमवत होते. त्यासाठी त्यांनी काही रक्कम नातेवाइकांकडून, मित्रांकडून तर काही व्यवसायाचे, असे एक कोटी ७३ लाख ५० हजार रुपये पंलगाखाली ठेवले होते. १७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४.४५ वाजता त्यांच्या घरी पाच अनोळखी इसमांनी प्रवेश करून नकली पिस्तुलीचा धाक दाखवत रोख रकमेच्या चार पिशव्या हिसकावून पांढऱ्या रंगाच्या कारने ते पळून गेले.
याबाबतची तक्रार रामनगर पोलीस स्टेशनमध्ये दाखल होताच पोलीस निरीक्षक मधुकर गीते, सहायक पोलीस निरीक्षक हर्षल एकरे यांनी पंचनामा करून तपास सुरू केला. १५ तासांत इम्रान इमाम शेख, शाहाबाज जबिउल्ला बेग, शुभम ऊर्फ मायाभाई नामदेव दाचेवार यांच्यासह एका विधिसंघर्षग्रस्त बालकाला अटक केली, तर एक जण फरार आहे. अटकेतील आरोपींकडून संपूर्ण एक कोटी ७५ लाख ५० हजार रुपये हस्तगत केले. त्यांना हे पैसे परत मिळविण्यासाठी कोर्टात पक्के पुरावे सादर करावे लागणार आहेत. त्यासोबतच हे पैसे नेमके आले कुठून याचा तपास आयकर विभाग घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
हेही वाचा - https://www.lokmat.com/chandrapur/fifty-two-crores-seized-robbers-15-hours-a329/