Review meeting of Humane Irrigation Project in Mumbai today | हूमन सिंचन प्रकल्पाबाबत आज मुंबईत आढावा बैठक

हूमन सिंचन प्रकल्पाबाबत आज मुंबईत आढावा बैठक

ठळक मुद्देमुख्यमंत्री उद्धव ठाकरे असणार अध्यक्ष : सुधीर मुनगंटीवार यांच्या विनंतीची दखल

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण सिंचन प्रकल्प असलेल्या हूमन सिंचन प्रकल्पाबाबत २४ जानेवारीला सायंकाळी ५ वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. विधीमंडळाच्या नागपूर येथील अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी चंद्रपूर जिल्हयातील विकासकामे व प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी हूमन प्रकल्पाबाबत स्वतंत्र उच्चस्तरीय बैठक बोलाविण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. त्यानुसार सदर बैठक आयोजित करण्यात आली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील सिरकाडा गावाजवळ हूमन नदीवर प्रस्तावित हा प्रकल्प पूर्ण झाल्यास चंद्रपूर जिल्ह्यातील १६० गावांकरिता ४६ हजार ११७ हेक्टर सिंचन निर्मिती होणार आहे. त्यासोबतच चंद्रपूर शहरासाठी पाणी पुरवठा, प्रकल्पालगतच्या वनक्षेत्रातील वन्यजीवांसाठी पाण्याची सोय होवून अति मागासीत आदिवासी भागाचा विकास होण्यास मदत होवून नक्षलवादी हालचालींवर अंकुश बसेल.
सदर प्रकल्पाला सर्वोच्च न्यायालयाची मान्यता मिळाल्याने सदर प्रकल्पाचे बांधकाम त्वरित सुरू करणे क्रमप्राप्त असल्याचे सांगत आ. मुनगंटीवार यांनी नागपुरातील आढावा बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बैठक आयोजित करण्याची विनंती केली होती. त्यानुसार सदर बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला जलसंपदा मंत्री, वनमंत्री, संबंधित विभागांचे सचिव, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक आदींची उपस्थिती राहणार आहे.
 

Web Title: Review meeting of Humane Irrigation Project in Mumbai today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.