ताडोबामधील रिसॉर्ट व्यवस्थापकाचा विजेचा शॉक लागून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2021 19:33 IST2021-06-13T19:31:43+5:302021-06-13T19:33:12+5:30
Death Case : पाण्याची टाकी स्वच्छ करताना बसला विजेचा धक्का

ताडोबामधील रिसॉर्ट व्यवस्थापकाचा विजेचा शॉक लागून मृत्यू
चिमूर (चंद्रपूर) : जगप्रसिद्ध ताडोबा व्याघ्रप्रकल्पामधील कोलारा गेटजवळ असलेल्या देवरी (चैती) येथील वन्य विलास रिसॉर्टमधील व्यवस्थापकाचा पाण्याची मोटार स्वच्छ करीत असताना विजेचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना रविवारी दुपारी १ वाजता दरम्यान वन्य विलास रिसॉर्टमध्ये घडली.
राघूदीप भवानी पांडा (३५ ) असे मृतकाचे नाव आहे. चिमूर तालुक्यातील व्हीआयपीसाठी प्रसिध्द असलेल्या वन्यविलास रिसॉर्टचे व्यवस्थापक आपल्या कर्मचाऱ्यांसह पाण्याची टॅंक साफ करून पाणी काढण्याची मोटार दुरुस्त करण्यासाठी पाण्याच्या टॅंकमध्ये उतरले. कर्मचाऱ्यांना बटन चालू बंद करण्यास सांगितले. बटन चालू करताच त्या मोटारपंपला विद्युत करंट असल्याने पांडा यांना जोरदार झटका लागला. उपस्थित कर्मचाऱ्यांनी मोटारपंपचा प्रवाह बंद केला. मात्र त्रिफेज विद्युत प्रवाह असल्याने पांडा खाली कोसळले.
दरम्यान उपस्थित रिसॉर्ट कर्मचाऱ्यांनी व्यवस्थापक पांडा यांना चिमूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र ङॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती चिमूर पोलिसांना देताच पंचनामा केला. पुढील तपास चिमूर पोलीस करीत आहेत