सावली :
सावली तालुक्यातील कवठी येथील शेतकऱ्यांच्या मका पिकांची वन्यप्राण्यांनी मोठ्या प्रमाणात नुकसान केली. यासाठी शेतकऱ्यांनी ग्रामपंचायतमार्फत वनपरिक्षेत्र अधिकारी यांना ठराव पाठवून वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली आहे.
कोरोना संकटात सापडलेले शेतकरी आपल्या कुटुंबांचे पालनपोषण करण्याकरिता हाथ उसने पैसे जमा करून मक्का पिकांची लागवड केली. परंतु वन्यप्राण्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. इकडे आड, तिकडे विहीर या उक्तीप्रमाणे शेतकऱ्याची अवस्था झालेली आहे. सावली शहरापासून सात किमीवर असलेल्या कवठी गाव परिसरात मागील काही दिवसापासून जंगली श्वापदांचा हैदोस वाढलेला आहे. कवठी परिसरातील शेतकऱ्यांनी मक्का पिकांची लागवड केली आहे. आणि आता ऐन हंगामाच्या वेळेस रानटी डुक्कर मोठया प्रमाणात शेतकऱ्याच्या पिकांचे नुकसान करीत आहेत. त्यामुळे मक्का पिकाला लावलेला खर्च तरी निघणार की नाही, अशा विवंचनेत शेतकरी सापडला आहे. सदर बाब शेतकऱ्यांनी नवनियुक्त ग्रा. प सदस्य राकेश घोटेकार यांना निदर्शनास आणून दिली असता त्यांनी तात्काळ ग्रापंची बैठक बोलावून त्यामध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित नुकसानभरपाई देण्यात यावी व वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशा मागणीचा ठराव केला. यावेळी सरपंच कांताबाई बोरकुटे, उपसरपंच विलास बट्टे, ग्रा. सदस्य सुनील कुळमेथे, संगीता पाल, मनिषा कोसरे, शितल कोरटवार, डिम्पल धोटे, सचिव सांगोडकर उपस्थित होते. हा ठराव वनविभागाला पाठविण्यात आला.