लोकमत न्यूज नेटवर्कभद्रावती (चंद्रपूर) : मोरवा येथील शेतकरी परमेश्वर ईश्वर मेश्राम (वय ५५) यांनी दि. २६ सप्टेंबर रोजी भद्रावती तहसील कार्यालयातच विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. उपचारादरम्यान तब्बल ११ दिवस जीवन-मरणाशी झुंज दिल्यानंतर ६ ऑक्टोबर रोजी पहाटे ३ वाजता त्यांचा मृत्यू झाला. मात्र, दोन दिवस आणि एक रात्र उलटूनही मृतदेह परिजनांनी ताब्यात घेण्यास नकार दिला. मृताच्या कुटुंबीयांनी प्रतिभा धानोरकर आणि त्यांचे भासरे अनिल धानोरकर यांच्यावर आरोप केले आहेत. दिवंगत बाळू धानोरकर यांच्याशी जमिनीच्या व्यवहारात फसवणूक झाल्यामुळे परमेश्वर मेश्राम यांनी आत्महत्या केल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. धानोरकर कुटुंबियांच्या दबावामुळे कोर्टात केस जिंकूनही जमीन त्यांच्या नावावर होत नसल्याचे कुटुंबियांचे म्हणणे आहे. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशानुसार वारसांची नोंद सातबाऱ्यावर घ्यावी आणि दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा, अन्यथा अंत्यसंस्कार करणार नाही, असा ठाम पवित्रा नातलगांनी घेतला आहे.
मेश्राम यांच्या आणि त्यांच्या वारसांची नावे न्यायालयाच्या स्पष्ट आदेशानुसार गाव नमुना ७ मध्ये नोंदवणे आवश्यक होते. मात्र, महसूल विभागाने मालकी हक्काबाबत वाद आहे, असे कारण सांगत आदेशाची अंमलबजावणी टाळली. दीर्घकाळ प्रकरण प्रलंबित ठेवल्याने मेश्राम मानसिक तणावाखाली होते. शेवटी त्यांनी तहसील कार्यालयातच विष प्राशन केले. या प्रकरणी पोलिसांनी मर्ग दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.
तहसीलदार व नायब तहसीलदार निलंबित
घटनेनंतर महसूल विभागाने तहसीलदार राजेश भांडारकर आणि नायब तहसीलदार सुधीर खांडरे यांना तत्काळ निलंबित केले. प्राथमिक चौकशीत दोघांनीही महसूल अधिनियम १९६६ आणि नागरी सेवा वर्तन नियम १९७९ चे उल्लंघन केल्याचे निष्पन्न झाले. शेतकरी संघटनांनीही केवळ निलंबन पुरेसे नाही, दोघांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून तत्काळ अटक करा, अशी ठाम मागणी केली आहे.
दुर्दैवी घटना : महसूल विभागाचा सेवा
पंधरवड्यात ही घटना घडल्याने प्रशासनावर टीकेची झोड उठली आहे. नागरिकांना जलद सेवा देण्याचे आश्वासन देणारे अधिकारी मात्र न्यायालयीन आदेशाची अंमलबजावणी करण्यात अपयशी ठरले. मोरवा गावात तसेच संपूर्ण जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. ग्रामस्थ आणि शेतकरी संघटनांनी न्याय मिळेपर्यंत आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. तसेच, या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
आज मृतकाचे काही नातलग आले होते. त्यांनी वारसांची सातबाऱ्यावर नोंद घेण्याची आणि आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. वैद्यकीय अहवाल आल्यानंतर चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे ठाणेदार योगेश्वर पारधी यांनी सांगितले.