खासगी शिक्षकांच्या जि.प. शाळेभोवती चकरा
By Admin | Updated: May 7, 2014 02:04 IST2014-05-07T02:04:01+5:302014-05-07T02:04:01+5:30
खाजगी शाळांच्या तुकड्या टिकविण्यासाठी तेथील शिक्षकांनी आता जिल्हा परिषदांच्या

खासगी शिक्षकांच्या जि.प. शाळेभोवती चकरा
नागभीड : खाजगी शाळांच्या तुकड्या टिकविण्यासाठी तेथील शिक्षकांनी आता जिल्हा परिषदांच्या शाळांभोवती विद्यार्थी मिळविण्यासाठी पिंगा घालणे सुरू केले आहे. जि.प.च्या शाळांचे निकाल लागल्याने खासगी शाळांच्या शिक्षकांचा ताण वाढला आहे. म्हणूनच विद्यार्थी व त्यांच्या टि.सी. मिळविण्यासाठी खासगी शाळांचे शिक्षक जिल्हा परिषदेच्या शाळेत वारंवार चकरा मारताना दिसत आहेत. विद्यार्थी कमी आणि शाळा अधिक हे सूत्र प्रत्येक ठिकाणीच नजरेस येत आहे. नागभीड तालुकासुद्धा त्याला अपवाद नाही. या तालुक्यात तर प्रत्येक चार किलोमीटर अंतरावर खासगी विद्यालये आहेत. काही गावांत तर दोन दोन हायस्कूल आहेत. अनेक ठिकाणी जिल्हा परिषदेची पूर्व माध्यमिक तर खासगी माध्यमिक शाळा आहेत. अशा गावात विद्यार्थी मिळविण्यासाठी चांगलीच चुरस निर्माण होत असते. नागभीड शहराचा विचार करता येथे तीन माध्यमिक, एक पूर्व माध्यमिक, दोन जि.प. शाळा आणि एक इंग्रजी माध्यमाचे कॉन्व्हेंट अशी शैक्षणिक प्रतिष्ठाने आहेत. या शैक्षणिक प्रतिष्ठानांपैकी तीन माध्यमिक शाळांमध्ये मात्र पाचवीचे विद्यार्थी-विद्यार्थिनी मिळविण्यासाठी चांगलीच चुरस निर्माण झाली आहे. पाचवीचे हे विद्यार्थी मिळविण्यासाठी खासगी शाळांचे शिक्षक विद्यार्थ्यांच्या घरी जावून त्यांच्या पालकांना आपलीच शाळा कशी श्रेष्ठ आहे, हे पटवून देण्याचा प्रयत्न तर करीत आहेतच, पण त्याबरोबर टी.सी. काढण्यासाठी येणारा खर्च आम्हीच करू, असे सांगत आहेत. सदर प्रतिनिधीने मंगळवारी येथील जिल्हा परिषद मुलींची आणि मुलांच्या शाळेकडे फेरफटका मारला असता नागभीड येथील तिन्ही खासगी शाळांचे शिक्षक जिल्हा परिषदेच्या शाळा परिसरात चकरा मारताना दिसून आले. (तालुका प्रतिनिधी)