अतिक्रमण हटाव मोहीम थंडबस्त्यात
चंद्रपूर : दुर्गापूर मार्गावर अनेकांनी अतिक्रमण केले. मनपाने अतिक्रमणधारकांना नोटीस बजावली होती. त्यामुळे काही अतिक्रमणधारकांनी स्वत: अतिक्रमण हटविले. मात्र अनेकांचे अतिक्रमण जैसे-थे आहे. मनपातर्फे अतिक्रमण हटविण्यासाठी कारवाई होत नसल्यामुळे ज्यांनी अतिक्रमण हटविले त्यांनीच पुन्हा रस्त्यावर अतिक्रमण केले आहे. त्यामुळे ही मोहीम सुरू करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
जमनजेट्टी परिसरातील पथदिवे बंद
चंद्रपूर : शहरातील जमनजेट्टी परिसरातील पथदिवे काही दिवसांपासून बंद आहेत. या मार्गावर वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे वाहनधारक व नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. महानगरपालिकेने या मार्गावरील पथदिवे दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांनी केली.
फळे पिकविण्यासाठी कार्बाईडचा वापर
चंद्रपूर : विविध प्रकारची फळे कृत्रिमरीत्या कॅल्शिअम कार्बाईडने पिकविल्या जातात. अशा फळांची जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आयात होत आहे. काही व्यावसायिक आपल्या गोदामात अशी प्रक्रिया करतात. अशा प्रकारची फळे खाल्ल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका आहे.
थकीत कर्जामुळे महामंडळे तोट्यात
चंद्रपूर : महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, अण्णा भाऊ साठे महामंडळाच्या माध्यमातून स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले जाते. मात्र, गेल्या काही वर्षात कर्ज घेऊन परतफेड न करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे राज्य शासनाच्या आदेशानुसार आता वसुली करण्यासाठी लवकरच नोटिसा बजावण्यात येणार आहेत.
स्मार्टफोनमुळे वाचनाकडे दुर्लक्ष
खडसंगी : आजच्या इंटरनेट युगात स्मार्ट फोन गरजेचीच झाली आहे. या साधनांचा ज्ञान व माहितीसाठी वापर पाहिजे. जागृतीअभावी तरुणाई या साधनांचा गैरवापर करीत आहे. अवांतर वाचनाकडेही दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे पालकांनी चिंता व्यक्त केली.
बेरोजगारांना कंत्राट देण्याची मागणी
चंद्रपूर : अभियांत्रिकी पदवी झालेल्या बेरोजगारांना शासनातर्फे कंत्राट देण्याचे धोरण आहे. मात्र यावर्षीपासून कंत्राट देणे बंद झाले आहे. त्यामुळे बेरोजगार अभियंत्यांना काम मिळेनासे झाले. शासकीय नोकरी बंद आहे. खासगी नोकरीत अल्प वेतन मिळते. आता शासनाकडून देण्यात येणारे कंत्राटसुद्धा बंद केले. त्यामुळे हा निर्णय रद्द करून कंत्राट देण्याची मागणी बेरोजगार अभियंत्यांनी केली आहे.