वरोऱ्यात कोविड लसीकरणाचा एक लाखांचा टप्पा पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:28 IST2021-09-11T04:28:00+5:302021-09-11T04:28:00+5:30
वरोरा : तालुक्यात कोविड लसीकरणाला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे तालुक्यात लसीकरणाचा एक लाखांचा टप्पा पूर्ण झाला आहे. ...

वरोऱ्यात कोविड लसीकरणाचा एक लाखांचा टप्पा पूर्ण
वरोरा : तालुक्यात कोविड लसीकरणाला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे तालुक्यात लसीकरणाचा एक लाखांचा टप्पा पूर्ण झाला आहे. प्रशासनाकडून लसीकरणाचे सत्र आयोजित करण्यात येत असून दररोज नागरिकांचे लसीकरण होत आहे. आतापर्यंत तालुक्यात १८ वर्षांवरील पात्र लाभार्थ्यांपैकी एकूण एक लाख १ हजार ३५४ लसीकरण पूर्ण झाले आहे. त्यापैकी ७७ हजार ८१८ जणांनी लसीकरणाचा पहिला, तर २३ हजार ५३६ जणांनी दोन्ही डोस पूर्ण केले आहे. वरोरा तालुक्यात लसीकरणाबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. दररोज प्रशासनाकडून लसीकरणाबाबत सत्र राबविण्यात येत आहे. त्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून नागरिक सकाळपासूनच रांगा लावत आहेत. शहरी भागात लसीकरणाची टक्केवारी ७७.०८ टक्के, तर ग्रामीण भागात ५०.६३ टक्के लोकांचे प्रथम डोस पूर्ण झाले आहेत. तालुक्यातील २५ गावांत ९० टक्केच्या वर लसीकरण पूर्ण झाले असून कोविडमुक्त ११ गावांत ९५ टक्केच्या वर लसीकरणाचे काम झालेले आहे. तालुक्यात मुबलक प्रमाणात लस उपलब्ध होत आहे. लसीकरणाच्या दिवशी साधारणत: पाच हजार लोकांना लस देण्यात येत आहे. लसीकरणामुळे आपले कोरोनापासून संरक्षण होते. लसीकरणातून कोणताही प्रकारचा धोका नाही, त्यामुळे नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन वरोरा उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राठोड, प्रभारी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बाळू मूंजनकर यांनी केले आहे.