चंद्रपूर : सध्या कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याचे दिसत असले तर चाचण्यांचे प्रमाण कमी झालेले नाही. चाचण्या सुरूच आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख ६८ हजार ५५६ जणांच्या कोरोना चाचण्या झाल्या आहेत. यापैकी एक लाख ४४ हजार १३१ नमुने निगेटिव्ह आले आहेत.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या २२ हजार १३५ वर पोहोचली आहे. यातील तब्बल २१ हजार १९२ कोविड रुग्णांनी यशस्वीपणे कोविडवर मात केली असून त्यांना सुटी देण्यात आली आहे. सध्या ५८४ बाधितांवर उपचार सुरू आहे.
मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोना संसर्गाची गती मंदावली आहे. दररोज कोरोनातून बरे होणाºयांची संख्या बाधित होणाºया रुग्णांच्या संख्येपेक्षा अधिक असल्याचे दिसून येत आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात संपूर्ण लॉकडाऊन संपुष्टात आले होते. दिवाळीच्या दिवसात रस्त्यांवर, बाजारपेठात तुंबड गर्दी दिसून येत होती. त्यामुळे दिवाळीनंतर कोरोना संसर्ग वाढून कोविड रुग्णांची संख्या झपाट्याने वाढेल, असे वाटले होते. मात्र तसे झाले नाही. उलट कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात चाचण्याही पूर्वीप्रमाणेच सुरू आहे. आतापर्यंत एक लाख ६८ हजार ५५६ जणांची कोरोना चाचणी करण्यात आलीे आहे. यातील एक लाख ४४ हजार १३१ नमुने निगेटिव्ह निघाले आहेत.
बॉक्स
६४ नव्या बाधितांची भर
जिल्ह्यात शनिवारी ८४ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर ६४ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली असून एका बाधितांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी मृत झालेल्यांमध्ये सोमनाथपूर ता. राजुरा येथील ७२ वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३५९ बाधितांचा मृत्यू झाला असून यात चंद्रपूर जिल्ह्यातील ३३२ जणांचा समावेश आहे. उर्वरित तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली १६, यवतमाळ सात, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.
बॉक्स
येथील आहेत नवे बाधित
शनिवारी नव्या ६४ बाधितांचा भर पडली आहे. यात चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील ३४, चंद्रपूर तालुका तीन, बल्लारपूर एक, भद्रावती एक, ब्रम्हपुरी एक, सिंदेवाही पाच, मूल दोन, गोंडपिपरी एक, राजुरा एक, चिमूर एक व वरोरा नऊ, कोरपना चार व इतर ठिकाणच्या एका रुग्णाचा समावेश आहे.
बॉक्स
नागरिकांनो संकट अजून गेलेले नाही
कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याचे दिसताच नागरिक पुन्हा स्वैर झाल्यासारखे दिसून येत आहेत. बाजारपेठेत, दुकानांमध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नसल्याचे दिसते. याशिवाय अनेक जणांनी तोंडावर मास्क घालणेही सोडून दिल्याचे दिसत आहे. कोरोनाचे संकट अजूनही पूर्णपणे गेलेले नाही. कोरोना नियमांचे पालन न केल्यास कोरोना संसर्ग आणखी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, नागरिकांनी स्वत:च्या आरोग्याबाबत जागरूक राहावे, बाहेर निघतांना नियमितपणे मास्कचा वापर करावा, वेळोवेळी हात स्वच्छ करावे तसेच प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.