आता तरी इरईचे संवर्धन करा हो, नागरिकांची आर्त हाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2021 05:00 IST2021-12-18T05:00:00+5:302021-12-18T05:00:47+5:30
इरई नदीवरील धरणामुळे चंद्रपूरच्या नागरिकांची तहान भागविली जात आहे. मात्र, या नदीच्या खोलीकरणाकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे. या नदीच्या संवर्धनासाठी इरई बचाव जनआंदोलनाने अनेकवेळा प्रशासनाला पुराच्या संभाव्य धोक्याचा इशारा दिला आहे. दरवर्षी नागरिकांना पुराचा धोका होत आहे. यामध्ये अनेकवेळा वित्तहानी झाली आहे. मात्र, प्रशासन, शासनकर्त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे इरईची दिवसेंंदिवस दुरवस्था होत आहे.

आता तरी इरईचे संवर्धन करा हो, नागरिकांची आर्त हाक
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर: चंद्रपूरची जीवनदायिनी म्हणून इरईची ओळख आहे. मात्र, मागील काही दिवसांपासून नदीपात्रात झुडपे तसेच पात्र उथळ झाले आहे. या नदीचे खोलीकरण करून बंधारे बांधण्याची मागणी केली जात आहे. मात्र, शासन तसेच प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने इरई बचाव जनआंदोलनाने पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा राज्य शासनाला दिला आहे.
इरई नदीवरील धरणामुळे चंद्रपूरच्या नागरिकांची तहान भागविली जात आहे. मात्र, या नदीच्या खोलीकरणाकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे. या नदीच्या संवर्धनासाठी इरई बचाव जनआंदोलनाने अनेकवेळा प्रशासनाला पुराच्या संभाव्य धोक्याचा इशारा दिला आहे. दरवर्षी नागरिकांना पुराचा धोका होत आहे. यामध्ये अनेकवेळा वित्तहानी झाली आहे. मात्र, प्रशासन, शासनकर्त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे इरईची दिवसेंंदिवस दुरवस्था होत आहे.
काही वर्षांपूर्वी जिल्हा प्रशासनाने खोलीकरणाचे काम हाती घेतले होते. मात्र, निधी संपल्याचे कारण देत काम थांबविले होते. ते कामही आजपर्यंत सुरूच झाले नसल्याने नदीचा आता नाला झाला आहे. त्यामुळे इरईचे खोलीकरण करून नदी पात्रामध्ये बंधारे बांधावे, अशी मागणीचे इरई (नदी) बचाव जनआंदोलनाने राज्य शासनाला निवेदन पाठविले आहे.
काम सुरू न केल्यास २२ मार्च जलसंपदा दिवसापासून नदी पात्रात जलसत्याग्रह तसेच २ ऑक्टोबरला महात्मा गांधी जयंतीपासून बेमुदत साखळी उपोषण करण्याचा इशाराही निवेदन देण्यात आल्याची माहिती इरई बचाव जनआंदोलनचे कुशाब कायरकर, पांडुरंग गावतुरे, अरविंद खोब्रागडे, संगीता विधाते, गीता अत्रे, संतीता देवतळे, माया गावतुरे यांच्यासह नागरिकांनी दिली.
अतिक्रमणही वाढले
- इरई नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढले आहे. अनेकांनी तर अगदी पात्रातच बांधकाम केले आहे. त्यामुळे अतिक्रमण काढण्याकडेही प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.