Vidarbha Rain : चंद्रपूरमध्ये निसर्गाचे रौद्ररूप ! वादळी पाऊस; विजांचा कडकडाट; घाबरलेल्या नागरिकांनी घरातील एकाच कोपऱ्यात काढली रात्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2025 13:27 IST2025-09-15T13:26:47+5:302025-09-15T13:27:39+5:30

Chandrapur : गेल्या काही दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. पावसाने आकाश फाटल्यासारखी स्थिती निर्माण केली असून, शेतीचे नुकसान दिवसेंदिवस गंभीर रूप धारण करीत आहे.

Nature's fury in Chandrapur! Stormy rain; thunder; frightened citizens spent the night in a corner of the house | Vidarbha Rain : चंद्रपूरमध्ये निसर्गाचे रौद्ररूप ! वादळी पाऊस; विजांचा कडकडाट; घाबरलेल्या नागरिकांनी घरातील एकाच कोपऱ्यात काढली रात्र

Nature's fury in Chandrapur! Stormy rain; thunder; frightened citizens spent the night in a corner of the house

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर :
शनिवारी रात्री जिल्ह्यात ११ वाजेपासून १२:३० वाजेपर्यंत प्रचंड वादळी पावसाने अक्षरशः कहर केला. यादरम्यान जोरदार विजांचा कडकडाट, ढगांचा प्रचंड गडगडाट आणि धो-धो पाऊस असा थरारक अनुभव नागरिकांनी घेतला. जणू काही निसर्गाने आपल्या रौद्ररूपाने सर्वत्र दहशत निर्माण केली होती. विशेष म्हणजे, रात्री झालेल्या या अचानक पावसामुळे अनेक कॉलनी आणि कुटुंबे पूर्णपणे जागी राहिली, अनेकांनी पहिल्यांदाच असा अनुभव घेतल्याची भावना व्यक्त केली आहे. काही ठिकाणी घरे तसेच झाडे कोसळल्याच्या घटनाही घडल्या.  विजांचा कडकडाट आणि पावसाचा अतिरेक, अशा वातावरणात अनेक कुटुंबांनी घरातील एकाच कोपऱ्यात रात्र काढली. विजेच्या झोतात क्षणभर लख्ख प्रकाशमान होणारा परिसर, त्यानंतरच गडगडाटाने होणारी दडपण आणणारी शांतता... हा अनुभव केवळ पावसाचा नव्हता, तर निसर्गापुढील मानवी असहायतेची जाणीव करून देणारा होता. 

झाड कोसळले, दुचाकी चक्काचूर

चंद्रपूर शहरातील प्रियदर्शनी चौक परिसरात पाण्याच्या टाकीजवळ असलेल्या शासकीय क्वार्टर्सजवळ सागवान झाड कोसळले, तर काही अंतरावर एक मोठे चिंचेचे झाड कोसळून एका दुचाकीवर पडले. दुचाकी पूर्णपणे चक्काचूर झाली. त्यावेळी परिसरात असलेला सुरक्षारक्षक सुरक्षित ठिकाणी असल्यामुळे तो थोडक्यात बचावला. 

शेतीचे मोठे नुकसान

गेल्या काही दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. पावसाने आकाश फाटल्यासारखी स्थिती निर्माण केली असून, शेतीचे नुकसान दिवसेंदिवस गंभीर रूप धारण करीत आहे. खरीप हंगामातील कापूस, सोयाबीन व तुरीची पिके मोठ्या प्रमाणावर बाधित झाली असून, लाखो शेतकऱ्यांच्या उपजीविकेवर घाला आला आहे.

Web Title: Nature's fury in Chandrapur! Stormy rain; thunder; frightened citizens spent the night in a corner of the house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.