Meeting of District Coordination Committee for Seventh Economic Census | सातव्या आर्थिक गणनेकरिता जिल्हा समन्वय समितीची बैठक
सातव्या आर्थिक गणनेकरिता जिल्हा समन्वय समितीची बैठक

ठळक मुद्दें१ हजार ८९२ प्रगणकांची निवड होणार । कुटुंंबांची माहिती संकलित करणार

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : केंद्र शासनातर्फे राष्ट्रव्यापी सातवी आर्थिक गणना घेण्यात येणार आहे. यामध्ये उद्योग, व्यवसाय व सेवा क्षेत्रातील कुटुंब तसेच उद्योगास भेट देऊन गणना करण्यात येणार आहे. ही गणना जिल्ह्यात यशस्वीरीत्या राबवण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समन्वय समिती गठीत करण्यात आली.
यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी जी. आर. वायाळ, एनआयसीचे प्रमुख सतीश खडसे, जिल्हा सांख्यिकी अधिकारी अमीत सुतार, सीएससीचे विभागीय प्रभारी निलेश कुंभारे, नगर परिषदांचे सर्व मुख्याधिकारी व इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
आर्थिक गणना दर पाच वर्षांनी होते. यापूर्वी २०१५ रोजी करण्यात आली होती. यावर्षी आर्थिक गणना प्रथमच पेपरलेस पद्धतीद्वारे राबवण्यात येणार आहे. या गणनेत उद्योग, रोजगार, कामगारांची संख्या, नोकरदार, स्वयंरोजगार, कामगार पणन संस्था, वस्त्रोद्योग, शाळा, महाविद्यालयांची संख्या, कुटुंबांचा आर्थिक स्थर, संकलित महसूल आदी घटकांची गणना केली जाणार आहे.
गणनेसाठी जिल्ह्यात १ हजार ८९२ प्रगणक व ४७३ पर्यवेक्षकांची आवश्यकता भासणार आहे. प्रगणक व पर्यवेक्षक म्हणून काम करण्यासाठी आॅनलाइन परीक्षा पास करावी लागेल. परीक्षेत उत्तीर्ण झालेल्यांना प्रगणक व पर्यवेक्षक म्हणून कॉमन सर्व्हिस सेंटर कडून निवड करण्यात येईल. हे प्रगणक प्रत्येक कुटुंबातपर्यंत पोहोचणार आहे.
गणनेवर संनियंत्रण ठेवण्यासाठी तसेच राज्यस्तरीय समितीशी समन्वय ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. खेमनार यांचे अध्यक्षतेखाली जिल्हा समन्वय समितीची स्थापना करण्यात आली. ही समिती प्रगणाची निवड करताना येणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी सहकार्य करणार आहे.प्रगणक तसेच पर्यवेक्षकाची नेमणूक करण्याची प्रक्रिया लवकर पूर्ण करण्यात यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी दिल्या.


Web Title: Meeting of District Coordination Committee for Seventh Economic Census
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.