तेरवीसाठी नागपूरला गेले अन् मृतदेहच घरी परतला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2022 15:37 IST2022-02-09T15:33:30+5:302022-02-09T15:37:26+5:30
दोन दिवसांपूर्वी त्याची अचानक प्रकृती बिघडली. दवाखान्याचा फेरा सुरू झाला. मात्र, मंगळवारी शासकीय दवाखान्यात त्याची उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली.

तेरवीसाठी नागपूरला गेले अन् मृतदेहच घरी परतला
चंद्रपूर : आयुष्य हे क्षणभंगूर आहे असे म्हटले जाते हे खोटे नाही. येथील येथील एक व्यक्ती नागपूर येथे नातेवाइकाच्या तेरावीच्या कार्यक्रमासाठी गेला होता. अचानक प्रकृती बिघडली. मात्र, यातच त्याचा मृत्यू झाल्याने मृतदेहच घरी परतला. या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे. शब्बीर खाॅ पठाण शम्मीम खाॅ पठाण (३५), रा. नवरगाव असे मृतकाचे नाव आहे.
शब्बीर हा मुस्लीम समाजाचा सक्रिय कार्यकर्ता होता. तो रत्नापूर फाट्यावर हाॅटेल व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा. कोरोनाच्या काळातही बिकट स्थितीतही तो डगमगला नाही. जिद्दीने पुन्हा व्यवसाय सुरू केला होता.
चार दिवसांपूर्वी नागपूरला मामाकडे तेरावीचा कार्यक्रम असल्याने पत्नीसह गेला होता. दोन दिवसांपूर्वी त्याची अचानक प्रकृती बिघडली. दवाखान्याचा फेरा सुरू झाला. मात्र, मंगळवारी शासकीय दवाखान्यात त्याची उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली. त्यांच्या मृत्यूपश्चात पत्नी व बराच मोठा आप्त परिवार आहे. नवरगाव येथील कब्रस्तानमध्ये त्याच्या पार्थिवावर दफनविधी करण्यात आला.