घरी सोडून देण्याच्या नावावर जंगलात नेऊन केले कुकर्म, आरोपी अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2022 16:10 IST2022-01-18T16:03:53+5:302022-01-18T16:10:04+5:30
भाजीपाला खरेदीनंतर अल्पवयीन मुलगी गावाकडे परत जाताना तरुणाने तिला गावाला सोडून देतो म्हणून दुचाकीवर बसविले. त्यानंतर दुचाकीत पेट्रोल भरायचे असल्याचे सांगून त्याने वाहन थेट जंगलात नेले आणि तिच्याशी कुकर्म केले.

घरी सोडून देण्याच्या नावावर जंगलात नेऊन केले कुकर्म, आरोपी अटकेत
चंद्रपूर : आठवडी बाजारात भाजीपाला घेऊन गावाकडे निघालेल्या अल्पवयीन मुलीला घरी सोडून देण्याचा विश्वास देऊन जंगलात नेले आणि तिच्यावर बलात्कार केल्याचा खळबळजनक प्रकार गोंडपिपरी तालुक्यात उघडकीस आला. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून अतुल गोविंदा तावाडे (२४), रा. खराळपेठ याला अटक केली आहे. आरोपीवर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोंडपिपरीपासून चार कि.मी. अंतरावरील गावातील १६ वर्षीय मुलगी भाजीपाला खरेदी करण्यासाठी गोंडपिपरी आठवडी बाजारात आली. भाजीपाला खरेदीनंतर ती गावाकडे परत जाताना खराळपेठ येथील एका तरुणाने तिला गावाला सोडून देतो म्हणून दुचाकीवर बसविले. अशातच दुचाकीत पेट्रोल भरायचे असल्याचे सांगून त्याने वाहन थेट जंगलात नेले आणि तिच्याशी कुकर्म केले.
विश्वासघात झाल्याचे पाहून मुलीने आरडाओरड केली. मात्र, आरोपीने गळा दाबून तिचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न केला. संधी मिळताच भाजीपाल्याची पिशवी तिथेच सोडून मुलीने मुख्य मार्गाकडे धाव घेतली. दरम्यान, गस्तीवर असलेल्या पोलिसाने आपली दुचाकी थांबवून तिची विचारपूस केली असता तिने घडलेला प्रकार सांगितला. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून गोंडपिपरी पोलिसांनी आरोपी अतुल तावाडे याच्याविरुद्ध ३६३, ३७६, अब भादंविसह कलम ४,६,८,१२ पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस अधिकारी रामटेके, राजगुरू करीत आहेत.