मामा तलावांचे ग्रहण सुटणार

By Admin | Updated: February 29, 2016 00:32 IST2016-02-29T00:32:29+5:302016-02-29T00:32:29+5:30

मामा तलावांना शेतकऱ्यांचे सुरक्षित सिंचन म्हटले जाते. मात्र मागील काही वर्षात या मामा तलावांची अवस्थाही वाईट झाली आहे.

Mama lakes will be eclipsed | मामा तलावांचे ग्रहण सुटणार

मामा तलावांचे ग्रहण सुटणार

गाळाचा उपसाही सुरू : जलयुक्त शिवारमध्ये तलावांच्या दुरुस्त्या
चंद्रपूर : मामा तलावांना शेतकऱ्यांचे सुरक्षित सिंचन म्हटले जाते. मात्र मागील काही वर्षात या मामा तलावांची अवस्थाही वाईट झाली आहे. वर्षानुवर्षापासून साठलेल्या गाळाचा उपसा नाही, फुटलेल्या तलावांची दुरुस्ती नाही. यामुळे जिल्ह्यातील १६७८ मामा तलावांपैकी ७० टक्के तलावांची साठवण क्षमता अत्यंत कमी होऊन धोक्यात आली आहे. तलावांच्या देखभाल व दुरुस्तीकरिता ज्या मापदंडानुसार निधी दिला जातो, तो अतिशय तोकडा होता. मात्र आता अर्थमंत्र्यांनी या निधीत वाढ करण्याची घोषणा केली असून जलयुक्त शिवार योजनेत व मनरेगामध्ये मोठ्या प्रमाणात मामा तलावांच्या दुरुस्त्या व गाळ काढण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे पुढील काळात मामा तलावांची साठवणूक क्षमता वाढण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांची अवस्था सध्या अतिशय नाजूक झाली आहे. निसर्गाचा कोप तर त्याच्या पाचवीलाच पूजला आहे. एवढे कमी आहे की काय, म्हणून अलिकडे शासनही शेतकऱ्यांवर कोपत असल्याचे दिसून येत आहे. काबाडकष्ट करून देशाचे उदर भरणारा शेतकरीच उदरनिर्वाहापासून वंचित होऊ लागला आहे. खरीप हंगाम तोंडावर आला की बियाणे, खतांची टंचाई होऊ देणार नाही, मुबलक प्रमाणात ते उपलब्ध करू, असे शासन व कृषी विभाग सांगत असला तरी प्रत्यक्षात हंगामात चित्र वेगळे असते. प्रशासकीय यंत्रणेच्या दुर्लक्षितपणाला सामोरे जात शेतकरी कसेबसे बियाणे व खतांची जुळवाजुळव करतो. यासाठी त्याला कृषी केंद्रातील लिंकिंगचाही भुर्दंड पेलावा लागतो. हे झाल्यानंतर पुढे पिकांवरील रोगराई व महागडी कीटकनाशके त्याचे कंबरडे मोडून टाकते. आलेल्या परिस्थितीशी दोन हात करून तो हंगाम सावरत असतानाच सिंचनाचा प्रश्न उभा ठाकतो.
शेतकऱ्यांसाठी सिंचनाला मोठे महत्त्व आहे. मात्र सध्या सिंचनाचीच समस्या सर्वाधिक गंभीर होत चालली आहे. त्यामुळे शेतकरी कर्जाच्या खाईत जाऊन आत्महत्येसारखा दुबळा मार्ग नाईलाजाने अवलंबत आहे. सिंचनासाठी शासनाने कोट्यवधी रुपयांचे मोठमोठे प्रकल्प उभारले आहे. काही प्रकल्प प्रस्तावित असून काही रखङलेले आहेत. असे असले तरी मामा तलावांचे सिंचनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्व आहे. चंद्रपूर जिल्ह्यात १६७८ मामा तलाव आहेत. यातील ७० टक्के मामा तलावांची दुरुस्ती रखडली होती. वर्षानुवर्ष बुडित क्षेत्रात गाळ साठत आल्यामुळे सर्व तलावांची साठवण क्षमता अत्यंत कमी झालेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात ओरड आहे.
विशेष म्हणजे, मामा तलाव हे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी वरदान आहे. या तलावांची सातत्याने काळजी घेणे आवश्यक आहे. हे तलाव क्षतिग्रस्त झाल्याचे सिंचाई विभागालाही माहीत आहे. मात्र तलाव दुरुस्तीसाठी यापूर्वी शासनाकडून व्यापक निधीच येत नव्हता. मात्र राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनात मामा तलावांच्या दुरूस्तीसाठी असलेल्या निधीत वाढ करण्याची घोषणा केली. त्यामुळे आता तलावांच्या दुरूस्तीला वाढीव निधी मिळणार आहे. याशिवाय जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेची कामेही धडाक्यात सुरू आहे. या योजनेंतर्गत मोठ्या प्रमाणात तलाव दुरूस्ती व गाळ उपसण्याची कामे सुरू असल्याची माहिती आहे. यासोबतच मनरेगाच्या कामांमध्येही तलाव दुरुस्ती व गाळ उपस्याचे कामे घेण्यात आली आहे. एकट्या नागभीड तालुक्यात २८३ तलावांमधील गाळ उपसण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे येत्या दोन वर्षात या तलावांची स्थिती सुधारून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. (शहर प्रतिनिधी)

जिल्ह्यात १९६३ शेततळ्यांचे उद्दिष्ट
यंदा पाणी टंचाईची शक्यताच
मामा तलावांच्या दुरुस्त्या होत असल्या तरी यावर्षी पाऊस कमी पडल्यामुळे जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प कोरडे पडत चालले आहे. पाण्याची पातळी खालावल्याने या उन्हाळ्यात नागरिकांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागणार, हे निश्चित मानले जात आहे.

यावर्षी शासनाने शेततळ्यांचेही उद्दिष्ट वाढविले आहे. शासनाने १७ फेब्रुवारी २०१६ च्या शासन निर्णयान्वये मागेल त्याला शेततळे ही योजना जाहीर केली आहे. या अंतर्गत जिल्ह्यात १९६३ शेततळ्यांचे लक्ष्यांक देण्यात आले आहे. ज्या शेतकऱ्यांच्या नावावर ०.६० हेक्टर व त्यापेक्षा जास्त जमीन आहे, ते या योजनेसाठी पात्र ठरणार आहे. यासाठी शासनाकडून शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे अनुदानही देण्यात येणार आहे.

Web Title: Mama lakes will be eclipsed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.