समृध्दी लोक कल्याणकारी संस्थेची मागणी
घुग्घुस : ‘लैंगिक अपराध अधिनियम २०१२’मध्ये सुधारणा करण्यासंदर्भात सूचना मागविण्यात आल्या होत्या. त्या अनुषंगाने लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, जेणेकरून अपराधी वृत्तीच्या लोकांमध्ये भीती निर्माण होईल, यासाठी विविध सूचना येथील समृध्दी लोक कल्याणकारी संस्थेच्या अध्यक्ष किरण बोढे यांनी ई-मेलवरून राज्य विधीमंडळ सचिवालयाच्या सचिवांना पाठविल्या आहेत.
लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ राज्यात लागू आहे. त्यामध्ये आणखी काही सुधारणा करण्याच्या उद्देशाने विधीमंडळ सचिवालयाचे सचिव राजेंद्र भागवत यांनी राज्यातील विविध सामाजिक संस्थांकडून सुधारणा व सूचना मागविल्या होत्या. त्या अनुषंगाने आरोपीला फाशीची शिक्षा, सश्रम कारावास तथा दंडाच्या रकमेत वाढ करावी, पीडिताला आर्थिक मदत, तक्रारीची तत्काळ दखल घेऊन गुन्हा दाखल करण्याची तरतूद करण्याच्या सूचना येथील समृध्दी लोक कल्याणकारी संस्थेच्या अध्यक्ष किरण बोढे यांनी आपल्या निवेदनातून केल्या आहेत.