मशीनमध्ये बिघाड; केंद्राधिकाऱ्याला हटविले
By Admin | Updated: October 15, 2014 23:32 IST2014-10-15T23:32:26+5:302014-10-15T23:32:26+5:30
७५ वरोरा विधानसभा मतदार संघात एकूण १८ उमेदवार रिंगणात आहेत. संघातील दोन लाख ६८ हजार ६५६ मतदार त्यांच्या भाग्याचा फैसला करणार आहेत. वरोरा तालुक्यातील चार इव्हीएम मशीनमधील

मशीनमध्ये बिघाड; केंद्राधिकाऱ्याला हटविले
वरोरा: ७५ वरोरा विधानसभा मतदार संघात एकूण १८ उमेदवार रिंगणात आहेत. संघातील दोन लाख ६८ हजार ६५६ मतदार त्यांच्या भाग्याचा फैसला करणार आहेत. वरोरा तालुक्यातील चार इव्हीएम मशीनमधील बॅलेट युनीटमध्ये झालेला बिघाड, केम मतदान केंद्रावर निर्माण झालेला तणाव हा अपवाद वगळता या मतदार संघात सर्वत्र शांततेत मतदान पार पडले. मतदानाला सुरुवात झाल्यानंतर प्रारंभी मतदारांचा निरुत्साहच दिसून येत होता. दुपारी १ वाजेपर्यंतही मतदार पाहिजे त्या प्रमाणात मतदार मतदानासाठी बाहेर पडले नाहीत. त्यानंतर मात्र हळूहळू मतदानाची टक्केवारी वाढू लागली. सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी ५७.८५ एवढी नोंदविण्यात आली.
केम मतदान केंद्र बंद पाडले
वरोरा मतदार संघातील केम येथील मतदान केंद्रात बोटावर शाई लावणाऱ्या अधिकाऱ्यांच्या टेबलवर एका पक्षाची जाहिरात होती. यावर काही मतदारांनी आक्षेप घेतला. वाद चिघळल्यानंतर या केंद्रावरील मतदान बंद पाडण्यात आले. अखेर ती जाहिरात हटवून संबंधित अधिकाऱ्यांनाही हटविल्यानंतर मतदान प्रक्रिया सुरू झाली.
चार केंद्रातील ईव्हीएम मशीन बंद
वरोरा मतदार संघातील पिजदुरा, गौराळा, आष्टा, माजरी या चार मतदान केंद्रातील इव्हीएम मशीनमध्ये सकाळी १० वाजताच्या सुमारास अचानक बिघाड आला. त्यामुळे या केंद्रावरील मतदान प्रक्रिया अर्धा तास बंद होती. त्यानंतर या ठिकाणी नवीन मशीनची व्यवस्था करण्यात आली. यामुळे मतदारांना त्रास सहन करावा लागला.
पोलिसांचा चोख बंदोबस्त
वरोरा मतदार संघात पाचही पक्षाचे बडे नेते रिंगणात होते. त्यामुळे कोणतीही अनूचित घटना घडू नये, यासाठी मतदार क्षेत्रात पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. वरोरा शहरात तर पोलिसांचे भरारी पथक सातत्याने मतदान केंद्र परिसराची पाहणी करताना दिसून येत होते.