लोकमत न्यूज नेटवर्कभिसी : मागील तीन वर्षांपासून युवतीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. एवढेच नाही तर तिचे अश्लील व्हिडीओ बनवून इन्स्टाग्रामवर अपलोड केले. या प्रकरणी पीडित युवतीच्या तक्रारीवरून भिसी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. राकेश कैलास चौधरी (२२) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
भिसी पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या वाढोणा येथील राकेश कैलास चौधरी (२२) याचे एका १९ वर्षीय युवतीशी सूत जुळले. मागील तीन वर्षापासून त्या दोघांमध्ये सुरू असलेल्या प्रेमप्रकरणामुळे अनेकदा शारीरिक संबंध प्रस्थापित झाले. दरम्यान, आरोपी युवकाने पीडित युवतीला न सांगता तिचे अनेक अश्लील व्हिडीओ बनविले. नंतर या व्हिडीओचा धाक दाखवून युवतीशी बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. ९ ऑगस्टला आरोपीने युवतीचे अश्लील व्हिडीओ इन्स्टाग्रामवर अपलोड करून तिची बदनामी केली. ही बाब लक्षात येताच युवतीने आपल्या पालकांना सोबत घेऊन आरोपी राकेशविरुद्ध भिसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. भिसीचे ठाणेदार मंगेश भोंगाडे, सह.उपनिरीक्षक रवींद्र वाघ व सह. उपनिरीक्षक थिटे यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता आरोपीला अटक केली.