मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता
By Admin | Updated: February 29, 2016 00:33 IST2016-02-29T00:33:30+5:302016-02-29T00:33:30+5:30
बीजीआर कंपनीच्या वजन काट्यावर झालेल्या प्रत्यक्ष वजनाहून दोन टन अधिक भंगार चोरुन नेत असताना...

मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता
ट्रकचालकास अटक : बीजीआरमधील भंगार चोरी प्रकरण
दुर्गापूर: बीजीआर कंपनीच्या वजन काट्यावर झालेल्या प्रत्यक्ष वजनाहून दोन टन अधिक भंगार चोरुन नेत असताना या कंपनीतील स्क्रॅपचा लिलाव मिळालेल्या स्क्रॅप मर्चंन्टच्या एका ट्रकला शनिवारी दुर्गापूर पोलिसांनी पकडले. यात मुद्देमालासह चालकास अटक करण्यात आली आहे. हा प्रकरा केव्हापासून सुरू आहे व यात किती जण गुंतले आहेत, याची चौकशी केली जात असून मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
वीज केंद्राच्या विस्तारित प्रकल्पात कार्यरत बीजीआर या कंत्राटी कंपनीने त्यांच्याकडे असलेल्या स्क्रॅपचा लिलाव केला. सर्वाधिक बोली बोलणाऱ्या तामिळनाडूतील एका स्क्रॅप मर्चन्टला हा लिलाव मिळाला. बीजीआर कंपनीत लिलाव केलेल्या स्क्रॅपव्यतिरिक्त शेकडो टन स्क्रॅप त्यांच्या परिसरात विखुरला आहे. बीजीआर कंपनीला अंधारात ठेवून येथे कार्यरत अधिकाऱ्यांनी आपसात संगनमत साधून मोजक्याच स्क्रॅपचा लिलाव केला. त्यानुसार स्क्रॅप मर्चंन्टने येथील स्क्रॅप नेणे सुरु केले. यामध्ये सावळागोंधळ होत असल्याची दुर्गापूर पोलिसांना गुप्त माहिती होती. या गैरप्रकारावर येथील ठाणेदार आर. के. सिंगनजुडे यांनी पाळत ठेवून शनिवारी स्क्रॅप घेऊन निघालेल्या ट्रक टी.एन. २९/एएम- ०९८५ ला पकडले. त्यात प्रत्यक्ष वजनाच्या दोन टन स्क्रॅप अधिक असल्याचे आढळून आले.
दुर्गापूर पोलिसांनी फौजदारी कायद्याच्या कलम ४१ (१) ड व मुंबई पोलीस कायद्याच्या कलम १२४ नुसार ट्रक जप्त करुन चालक के. अय्यप्पन पी. कलीया पेरुमला (२६) रा. तामिळनाडू याला अटक केली आहे. सदर प्रकरणाचा सखोल तपास येथील पोलीस उपनिरीक्षक कावडे करीत आहे. या प्रकरणात सहभागी मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे. उल्लेखनीय म्हणजे केंद्रीय सुरक्षा दल येथे लवकरच दाखल होणार आहे. त्याआधी हा सावळागोंधळ आटोपण्याचाही बीजीआरच्या येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा डाव असल्याचे सर्वत्र बोलले जात आहे. (वार्ताहर)