किडनी रॅकेटचे केंद्र तामिळनाडूत; ८० लाखांपर्यंत सौदा, शेकडो लोकांच्या किडनी काढून करोडो जमवले; दोन नामांकित डॉक्टरांची नावे पुढे
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 14:13 IST2026-01-01T14:12:46+5:302026-01-01T14:13:21+5:30
यात दोन नामांकित डॉक्टरांची महत्त्वाची भूमिका असून हे रॅकेट एका किडनीचा सौदा ५० ते ८० लाखांत करायचे. मात्र, पीडिताला केवळ पाच ते आठ लाख रुपयेच द्यायचे, अशी माहिती पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी बुधवारी माध्यमांना दिली.

किडनी रॅकेटचे केंद्र तामिळनाडूत; ८० लाखांपर्यंत सौदा, शेकडो लोकांच्या किडनी काढून करोडो जमवले; दोन नामांकित डॉक्टरांची नावे पुढे
चंद्रपूर : किडनी प्रकरणाला आता गंभीर वळण आले आहे. याचे भारतातील केंद्र तामिळनाडूतील त्रिची येथील स्टार किम्स हॉस्पिटल असल्याचे पुढे आले आहे. येथे शेकडो जणांच्या किडनी काढण्यात आल्याचा संशय आहे. यात दोन नामांकित डॉक्टरांची महत्त्वाची भूमिका असून हे रॅकेट एका किडनीचा सौदा ५० ते ८० लाखांत करायचे. मात्र, पीडिताला केवळ पाच ते आठ लाख रुपयेच द्यायचे, अशी माहिती पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी बुधवारी माध्यमांना दिली.
एलसीबी पथकाने ताब्यात घेतलेल्या दिल्लीतील डॉ. रवींद्रपाल सिंगला दिल्ली न्यायालयातून ट्रॉन्झिट रिमांड मिळाला. २ जानेवारी २०२६ पर्यंत मुख्य न्यायदंडाधिकारी चंद्रपूर यांच्या समक्ष हजर व्हावे, असे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. स्टार किम्स हॉस्पिटलचे संचालक डॉ. राजरत्नम गोंविदस्वामी हा श्रीलंकेत फरार झाल्याचा संशय आहे. एलसीबीची चार पथके देशभरात आरोपींचा शोधात आहे.
डॉक्टर पुरावे करायचे नष्ट
पीडित रोशन कुळे याने डाॅ. क्रिष्णा व हिमांशू भारद्वाजच्या माध्यमातून किडनी विक्री केली. त्यांच्या मोबाइल डेटावरून पोलिस तपास दिल्ली व तामिळनाडूच्या डॉक्टरांपर्यंत पोहोचला.
डॉ. रवींद्रपाल सिंग हा दिल्लीवरून त्रिचीतील स्टार किम्स हॉस्पिटलमध्ये डाॅ. राजरत्नम गोंविदस्वामीच्या मदतीने किडनी काढून याबाबतचे पुरावे नष्ट करायचे. अशाप्रकारे मोठ्या प्रमाणावर किडनी काढण्यात आल्याचा पोलिसांना संशय आहे.
तिरुची कनेक्शन
तामिळनाडूतील तिरुची (तिरुचिरापल्ली) येथील एका हॉस्पिटलमध्ये किडनीचा गोरखधंदा सुरू होता. ते डॉ. राजरत्नम गोंविदस्वामी यांच्याशी संबंधित असल्याची माहिती आहे.
लाखोंचे कमिशन
किडनी घेणाऱ्या व्यक्तीकडून तब्बल ५० ते ८० लाख रुपये उकळत होते. यामध्ये डॉ. रवींद्रपाल सिंगला १० लाख रुपये, डॉ. राजरत्नम गोंविदस्वामी यांना सर्जरी व हॉस्पिटीलिटीमुळे २० लाख, डाॅ. क्रिष्णा (रामकृष्ण सुंचू) व साथीदाराला २० लाख रुपयांचे कमिशन द्यायचे. किडनी देणाऱ्याची केवळ पाच ते आठ लाखांत बोळवण करायचे.
तपासात तामिळनाडू सरकारचे असहकार्य
स्टार किम्सचे एमडी डॉ. राजरत्नम गोंविदस्वामी हे तामिळनाडूतील मंत्र्याचे नातेवाईक आहेत. त्याला पकडण्यासाठी एलसीबीचे पथक पोहोचलेसुद्धा होते. मात्र, राजकीय हस्तक्षेपामुळे त्यांना अटक करता आली नाही.
अशात ते फरार झाले. ट्रॉन्झिट रिमांडवर असलेले डॉ. रवींद्रपाल सिंगचे सन २०२२ मध्ये पद्मश्रीसाठी नामांकन झाल्याची पोलिस सूत्रांची माहिती आहे.