चंद्रपूर : ताडोबालगतच्या वनविकास महामंडळ अंतर्गत येणाऱ्या खडसंगी वनपरिक्षेत्रातील महालगाव बिटात कलुवा नावाने ओळखल्या जाणाऱ्या वाघाने नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील करांडला येथून आलेल्या जानवी नावाच्या वाघिणीच्या एका बछड्याला जागीच ठार केले. हा थरार सोमवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडल्याची माहिती आहे. कलुवा हा वाघ खडसंगीनजीकच्या शेडेगाव पर्यटन सफारीदरम्यान पर्यटकांना दिसतो. अलीकडेच ताडोबाच्या खडसंगी बफर क्षेत्रात छोटा मटकाने ब्रह्मा नावाच्या वाघाला झुंज करून ठार केले होते. याच परिसरानजीकची ही दुसरी घटना आहे.
शेडेगाव पर्यटन सफारीला लागूनच वन विकास महामंडळाचे जंगल आहे. ही घटना खडसंगीच्या भिसी क्षेत्र कार्यालय अंतर्गत महालगाव बीटातील कंपार्टमेंट नंबर २१ मध्ये घडलेली आहे. या जंगलामध्ये उमरेड करांडला येथून जानवी नावाची वाघीण आपल्या तीन बछड्यांसोबत आलेली आहे. हे तिन्ही बछडे जवळपास आठ महिन्यांचे आहे. या ठिकाणी नर कलूवा या वाघाचे वास्तव्य आहे. त्या कलूवा वाघाने बछड्याच्या मानेला पकडून ठार केलेले आहे. ही घटना शेडगाव पर्यटन सफारीच्या पर्यटकासमोरच घडलेली असल्याचे समजते.
घटनेचा पंचनामा खडसंगी वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल सोनुलकर, चिमूर वनपरिक्षेत्र अधिकारी किशोर देऊळकर, वन्यजीव प्रेमी मुकेश भांदककर यांनी पंचनामा केला. बछड्याला शवविच्छेदनासाठी ट्रांजिट ट्रीटमेंट सेंटर चंद्रपूर येथे आणलेले आहे.