'मला गर्लफ्रेण्ड मिळत नाहीये.. तुम्ही पुढाकार घ्या'.. तरुणाने पत्र लिहून आमदारांसमोर व्यक्त केली खंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 19:17 IST2021-09-13T19:11:53+5:302021-09-13T19:17:30+5:30
Chandrapur News लाख लाख प्रयत्न करूनही मुलींनी भाव काही दिला नाही, यामुळे खचलेल्या एका तरुणाने थेट आमदारांनाच पत्र लिहिले. 'गर्लफ्रेण्ड मिळत नाही... हा माझ्यावर घोर अन्याय होत असून आता तुम्हीच पुढाकार घ्या', अशी विनंती थेट पत्रातून त्याने केली आहे.

'मला गर्लफ्रेण्ड मिळत नाहीये.. तुम्ही पुढाकार घ्या'.. तरुणाने पत्र लिहून आमदारांसमोर व्यक्त केली खंत
नीलेश झाडे
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कुणाचा जीव कुणावर कधी जडेल, याचा नेम नाही. प्रेमाच्या बाबतीत काहींचे नशीब फारच चमकलेले असते, तर दुसरीकडे काही जण शोध मोहिमेतच गुंतलेले दिसतात. लाख लाख प्रयत्न करूनही मुलींनी भाव काही दिला नाही, यामुळे खचलेल्या एका तरुणाने थेट आमदारांनाच पत्र लिहिले. 'गर्लफ्रेण्ड मिळत नाही... हा माझ्यावर घोर अन्याय होत असून आता तुम्हीच पुढाकार घ्या', अशी विनंती थेट पत्रातून त्याने केली आहे. हा तरुण राजुरा विधानसभा क्षेत्रातील आहे. हे पत्र समाजमाध्यमात भलतेच व्हायरल होत असून हशा पिकवत आहे. (I can't find a girlfriend .. You take the initiative .. The young man wrote a letter and expressed his grief in front of the MLAs)
'प्रेम म्हणजे प्रेम असते, तुमचे आमचे सेम असते,' ही गाजलेली कविता. मात्र प्रत्येक वेळी सेम टू सेम असतेच असे नाही. आता हेच बघा, राजुरा विधानसभा क्षेत्रातील भूषण नावाच्या तरुणाने प्रयत्नांची पराकाष्टा केली. मात्र त्याची प्रेयसी होईल, अशी कुणी मिळाली नाही. आपल्या सर्व मित्रांना प्रेयसी आहे, मात्र मलाच का नाही? हे दु:ख त्याला छळू लागले. अखेर त्याने थेट राजुरा विधानसभा क्षेत्रातील आमदारांनाच पत्र लिहिले व मला तरुणी का पटत नाही, असा सवाल त्यांना केला. नुसता सवालच केला नाही, तर यासाठी काही तरी उपाययोजना अंमलात आणण्याचा प्रयत्न करावा, अशी विनंतीही केली. हे पत्र समाजमाध्यमावर व्हायरल झाले असून बऱ्याच जणांसाठी तर हा करमणुकीचा व विनोदाचा विषय बनला आहे.