पतीने जीव तोडून ओढले, पण वाघाच्या हल्ल्यातून सुटली नाही पत्नी; मूल तालुका हादरला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 14:49 IST2025-09-09T14:47:22+5:302025-09-09T14:49:17+5:30

Chandrapur : वाघ व पती दोघेही विरुद्ध दिशेने ओढत होते. अखेर तुळशीराम जोरात ओरडल्याने वाघाने अन्नपूर्णाला सोडून पळ काढला.

Husband tried to escape, but wife did not escape tiger attack; Mul taluka shaken | पतीने जीव तोडून ओढले, पण वाघाच्या हल्ल्यातून सुटली नाही पत्नी; मूल तालुका हादरला

Husband tried to escape, but wife did not escape tiger attack; Mul taluka shaken

लोकमत न्यूज नेटवर्क
भेजगाव (चंद्रपूर) :
मूल तालुक्यातील मारोडा नियत क्षेत्रातील सोमनाथ आमटे फार्म क्र. २ येथे सोमवारी (८ सप्टेंबर) सकाळी सहाच्या सुमारास वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झाला. अन्नपूर्णा तुळशीराम बिलोने (वय ५२) असे मृत महिलेचे नाव आहे. सकाळी घराच्या मागील बाजूस भांडी घासत असताना अन्नपूर्णा यांच्यावर अचानक वाघाने हल्ला केला. वाघाने फरफटत नेलेल्या पत्नीला वाचविण्याचे पतीचे सर्वतोपरी प्रयत्न केले. पण सगळे प्रयत्न व्यर्थ ठरले.

अन्नपूर्णा यांच्या किंचाळण्याने त्यांचे पती तुळशीराम बिलोने धावत आले व पत्नीला वाचविण्याचा प्रयत्न केला. वाघ अन्नपूर्णा यांना फरफटत नेत असताना तुळशीराम तिचे पाय पकडून तिला वाघाच्या तावडीतून सोडवण्याचे प्रयत्न करू लागले. काही वेळ वाघ व पती दोघेही विरुद्ध दिशेने ओढत होते. अखेर तुळशीराम जोरात ओरडल्याने वाघाने अन्नपूर्णाला सोडून पळ काढला. मात्र, तोपर्यंत महिलेचा मृत्यू झाला होता.

वाघाच्या वाढत्या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये भीती

कर्मयोगी बाबा आमटे यांनी स्थापन केलेल्या सोमनाथ आमटे फार्म परिसरात आजही अनेक कुष्ठ रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांचे वास्तव्य आहे. मात्र, जंगलालगतच्या या परिसरात वाघाचा वावर वाढत असून, येथील नागरिक सतत भीतीच्या छायेत जीवन जगत आहेत.

वनविभागावर निष्क्रियतेचा आरोप 

सततच्या घटनेनंतरही वनविभागाकडून कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही, अशी स्थानिकांची तक्रार आहे. वाघाचा बंदोबस्त करावा, वन्यप्राण्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

दोन महिन्यांत दोन गुराखी जखमी

मारोडा गावालगतच १९ जुलै रोजी गणपत मानेवार व ४ सप्टेंबर रोजी किशोर पुरुषोत्तम चौधरी या दोन गुराख्यांवर वाघाने हल्ला करून गंभीर जखमी केले होते. या घटना ताज्या असतानाच अन्नपूर्णा बिलोने यांच्या मृत्यूने संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Web Title: Husband tried to escape, but wife did not escape tiger attack; Mul taluka shaken

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.