सावकारांनी किती जणांना गंडविले? किडनी विक्री प्रकरणातील आर्थिक हिशेब अद्यापही गुलदस्त्यातच
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 13:49 IST2025-12-27T13:38:43+5:302025-12-27T13:49:36+5:30
आरोपी सावकारांनी किती कर्ज दिले होते, याचाही ठोस आकडा उघड झालेला नाही.

सावकारांनी किती जणांना गंडविले? किडनी विक्री प्रकरणातील आर्थिक हिशेब अद्यापही गुलदस्त्यातच
Chandrapur Illegal Money lenders: सावकारी पाशात अडकलेल्या एका शेतकऱ्याला किडनी विकण्याचा निर्णय घ्यावा लागणे, हे राज्याला हादरवून सोडणारे वास्तव समोर आणणाऱ्या प्रकरणातील तपास आता मंदावल्याची चर्चा सुरू झाली आहे. या प्रकरणातील फरार सहावा आरोपी सावकार मनीष घाटबांधे अखेर पोलिसांना शरण आला. मात्र, त्यानंतरही तपासातील महत्त्वाचे मुद्दे अजूनही अनुत्तरितच आहेत.
गंभीर बाब म्हणजे, याप्रकरणात आरोपी किशोर बावनकुळे, लक्ष्मण उरकुडे, प्रदीप बावनकुळे, संजय बल्लारपुरे, सत्यवान बोरकर व मनीष घाटबांधे या सावकारांनी आतापर्यंत पीडित शेतकरी रोशन कुळे याच्याकडून नेमकी किती रक्कम वसूल केली. त्याचप्रमाणे, आरोपी सावकारांनी रोशन कुळे याला किती कर्ज दिले होते, याचाही ठोस आकडा उघड झालेला नाही.
अवैध सावकारीतून आरोपींनी नेमकी किती माया जमवली, कोणत्या मालमत्ता खरेदी केल्या, त्या मालमत्तांचा स्रोत काय, याचा तपास अजून प्राथमिक टप्प्यातच असल्याचे चित्र आहे. बँक व्यवहार, रोख देवाणघेवाण, मालमत्ता खरेदी-विक्री आणि आर्थिक नोंदी यांचा एकत्रित हिशेब अद्याप गुलदस्त्यातच आहे.
तपास यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्न
तपासाच्या सुरुवातीला आक्रमक भूमिका घेतल्यानंतर आता ब्रह्मपुरी पोलिसांचा तपास मागे पडत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. आर्थिक तपासात अपेक्षित वेग दिसत नसल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या प्रकरणात पीडित शेतकऱ्याने किडनी विकली. या गंभीर घटनेनंतरही सावकारांकडील आर्थिक व्यवहारांचा संपूर्ण हिशेब उघड न होणे, हे तपास यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित करणारे आहे.
सावकारांची खरी आर्थिक सत्ता कधी उघड होणार?
या प्रकरणाचा तपास केवळ अटकेपुरता मर्यादित न राहता संपूर्ण आर्थिक साखळी उघड करण्याची गरज आहे. अन्यथा, हे प्रकरणही केवळ कागदोपत्री गुन्हा ठरून थंडावण्याची भीती नाकारता येत नाही. शेतकऱ्याचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या या सावकारांची खरी आर्थिक सत्ता कधी उघड होणार? आणि तपासाला पुन्हा धार कथी मिळणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.