चंद्रपूरमध्ये दोन तालुक्यात अतिवृष्टीने पाच हजार शेतकऱ्यांचे नुकसान; मंत्र्यांसह लोकप्रतिनिधी पाहणीसाठी बांधावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 20:16 IST2025-09-25T20:14:43+5:302025-09-25T20:16:13+5:30
पाच हजार शेतकऱ्यांना फटका : पालकमंत्र्यांसह कृषी राज्यमंत्र्यांनी केली शेतीची पाहणी

Heavy rains in two talukas of Chandrapur cause damage to five thousand farmers; Ministers and public representatives visit dam for inspection
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : अतिवृष्टीमुळे चिमूर तालुक्यात ३ हजार १७.५३ हेक्टर व वरोरा तालुक्यात ६९२.२५ हेक्टर क्षेत्रातील पिके उद्ध्वस्त झाली. याचा एकूण ४ हजार ९९२ शेतकऱ्यांना फटका बसला. त्यामुळे राज्याचे आदिवासी विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके आणि कृषी राज्यमंत्री अॅड. आशिष जयस्वाल यांनी बुधवारी (दि. २४) शेतीची पाहणी करून नुकसानीची स्थिती जाणून घेतली.
चिमूर तालुक्यातील भिसी येथे प्रकाश खाटीक व विलास खाटीक, वाहनगाव येथील बालाजी जुगनाके, बोथलीचे नितीन खापणे, खामगावच्या शालू रामटेके तसेच वरोरा तालुक्यातील चारगाव (बु) येथील प्रफुल्ल सोनकर, भेंडाळाचे संजय उरकुडे आदी शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन बाधित शेतमालाची पाहणी केली. चिमूर तालुक्यात पाहणीदरम्यान आमदार कीर्तीकुमार भांगडिया, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. संतोष थिटे, उपविभागीय अधिकारी किशोर घाडगे, तहसीलदार श्रीधर राजमाने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार आदी उपस्थित होते. वरोरा तालुक्यातील पाहणीदरम्यान खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार करण देवतळे, जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी., मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, उपविभागीय अधिकारी अतुल जटाळे, तहसीलदार योगेश कौटकर आदी उपस्थित होते.
असे आहे नुकसानीचे स्वरूप
अतिवृष्टीने चिमूर तालुक्यात ३ हजार १७.५३ हेक्टर क्षेत्रात नुकसान झाले. बाधित शेतकऱ्यांची एकूण संख्या ३ हजार ४१८ आहे. वरोरा तालुक्यात एकूण बाधित क्षेत्र ५९२.२५ हेक्टर आणि बाधित शेतकरी संख्या १ हजार ४०८ आहे.
जून व ऑगस्टच्या भरपाईपासून जिल्ह्याला वगळले
जून ते ऑगस्ट २०२५ दरम्यान अतिवृष्टी व पुराने नुकसान झाले होते. मात्र, राज्य शासनाने मंगळवारी (दि. २३) जाहीर केलेल्या भरपाईपासून चंद्रपूर जिल्ह्याला वगळल्याने शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. पीक नुकसानीसाठी राज्यात १ हजार ३३९ कोटी ४९ लाख २५ हजारांची भरपाई मंजूर झाली. यात नागपूर विभागातील गोंदिया, भंडारा, गडचिरोली व नागपूर जिल्ह्यांचा समावेश केला. मात्र, याच कालावधीत चंद्रपूर जिल्ह्यात अतिवृष्टी व पुराने पिकांचे मोठे नुकसान झाले. मात्र, राज्य शासनाने भरपाईपासून वगळल्याने पंचनाम्याचा उपयोग काय, असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत.
अधिकाधिक भरपाई मिळवून देऊ- पालकमंत्री डॉ. अशोक उईके
अतिवृष्टीने सोयाबीनचे मोठे नुकसान झाले. पंचनाम्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांमार्फत तत्काळ शासनास पाठवला जाईल. शेतकऱ्यांना नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अधिकाधिक भरपाई मिळवून देऊ, अशी ग्वाही पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी दिली.
सप्टेंबरचे पंचनामे सुरू- आशिष जयस्वाल
सोयाबीनचे दाणे अतिशय छोटे असून काही भागांत कटाईलाही परवडणार नाही. मागील महिन्याच्या भरपाईचा निर्णय झाला. सप्टेंबरच्या पंचनाम्याची प्रक्रिया सुरू आहे. याबाबत प्रशासनाला सूचना देण्यात आल्या. नुकसानीचा अहवाल शासन स्तरावर पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती कृषी राज्यमंत्री अॅड. आशिष जयस्वाल यांनी पाहणीदरम्यान दिली.