दुचाकी, ट्रॅक्टरसह साडेतीन एकर शेतीही विकली, तरीही व्याजाचा डोंगर वाढताच... सावकाराचा तगादा; शेतकऱ्याने विकली किडनी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 06:16 IST2025-12-17T06:15:07+5:302025-12-17T06:16:03+5:30
धक्कादायक : अवघ्या एक लाखाच्या कर्जापोटी तब्बल ७४ लाख रुपयांची परतफेड करूनही चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्याचा अवैध सावकारांकडून क्रूर छळ

दुचाकी, ट्रॅक्टरसह साडेतीन एकर शेतीही विकली, तरीही व्याजाचा डोंगर वाढताच... सावकाराचा तगादा; शेतकऱ्याने विकली किडनी
नागभीड (जि. चंद्रपूर): अवघ्या एक लाख रुपयांच्या कर्जापोटी सावकारांना तब्बल ७४ लाख रुपयांची परतफेड करावी लागली. कर्जाच्या अमानुष तगाद्यामुळे शेती, वाहने विकल्यानंतर अखेर शेतकऱ्यावर स्वतःची किडनी विकण्याची वेळ आली. अवैध सावकारांच्या क्रूर छळाचा हा धक्कादायक प्रकार चंद्रपूरच्या नागभीड तालुक्यातील मिंथूर गावात उघडकीस आला आहे. रोशन शिवदास कुळे (३५, रा. मिंथूर) असे पीडित शेतकऱ्याचे नाव आहे. या प्रकरणात सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे.
रोशन कुळे या पीडित शेतकऱ्याने दुग्धव्यवसायासाठी १५ ते २० गायी खरेदी केल्या. मात्र लम्पी आजाराने काही जनावरे दगावल्याने व्यवसाय तोट्यात गेला. अडचणीत सापडलेल्या रोशनने ब्रह्मपुरीतील काही अवैध सावकारांकडून एक लाख रुपये कर्ज घेतले. मात्र चार ते पाच जणांच्या टोळीने अवाढव्य व्याज आकारत दमदाटी सुरू केली. कर्ज फेडण्यासाठी रोशनने दुचाकी, ट्रॅक्टर, साडेतीन एकर शेतीही विकली; मात्र व्याजाचा डोंगर वाढतच राहिला व अखेर त्याला आपली किडनी विकावी लागली.
या प्रकरणात सहा जणांविरुद्ध ब्रह्मपुरी पोलिस ठाण्यात कलम १२० ब, ३२६, ३४२, २९४, ३८७, ५०६, ३४ भांदवि सहकलम ३९, ४४, महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ अन्वये मंगळवारी रात्री ७ वाजता गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली आहे.
हे आहेत आरोपी
किशोर रामभाऊ बावनकुळे, लक्ष्मण पुंडलिक उरकुडे, प्रदीप रामभाऊ बावनकुळे, संजय विठोबा बल्लारपुरे, मनीष पुरुषोत्तम घाटबांधे, सत्यवान रामरतन बोरकर सर्व रा. ब्रह्मपुरी अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
पैशांसाठी सावकारांकडून छळ; शेतकऱ्याला डांबून मारहाण
"रोशन कुळे या शेतकऱ्याचा सावकारांनी पैशांसाठी छळ केल्याचे पुढे आले आहे. त्यांना डांबून मारहाणही झालेली आहे. सावकारांच्या पैशांच्या तगाद्यामुळेच ऑक्टोबर २०२४ मध्ये आपण कंबोडियात किडनी विकल्याचे पीडित सांगत आहे. याचा नेमका तपास करण्यात येत आहे. पीडिताने सावकारांना दिलेल्या रकमेच्या नोंदींवरून सावकारांमुळेच किडनी विकण्याची शक्यता नाकारता येत नाही. तपासात सगळे निष्पन्न होईल."
- मुम्मका सुदर्शन, पोलिस अधीक्षक, चंद्रपूर
यु-ट्यूब सर्च करून गाठले कंबोडिया
सावकारांचा पैशांसाठी तगादा सुरू असल्यामुळे किडनी विकून पैसे परतफेड करण्याचा निर्णय घेतला. यासाठी यु-ट्यूब सर्च करून आपण कंबोडिया या देशात गेलो. तत्पूर्वी कोलकाता येथे आवश्यक तपासण्या करण्यात आल्या. यानंतर कंबोडिया देशात आठ लाख रुपयांना किडनी विकली आणि तेही सावकारांनी बळकावल्याचे शेतकरी रोशन कुळे यांनी पोलिसांना सांगितल्याचे समजते.
दोषींवर कारवाई करा : वडेट्टीवार
ब्रह्मपुरी येथील शेतकऱ्याने सावकाराचे कर्ज फेडण्यासाठी किडनी विकल्याप्रकरणी पोलिसांना पत्र लिहून चौकशी आणि कारवाई करण्याची मागणी केल्याचे काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. हे प्रकरण समजल्यावर त्या शेतकऱ्याला मदत केली असून त्याला न्याय मिळावा म्हणून पाठपुरावा करणार असल्याचेही ते म्हणाले.
डॉ. संजय कोलते, अध्यक्ष झोनल ट्रान्सप्लांट कॉर्डिनेशन सेंटर, नागपूर
कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्याला किडनी विकावी लागली ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. अवयव खरेदीदार आणि विक्रेते अशा व्यवहारांसाठी ठिकाणे कशी शोधतात, हे विचार करायला लावणारे आहे. अशा प्रकारचा घृणास्पद व्यापार केवळ निंदनीयच नाही, तर तो दाते आणि प्राप्तकर्ते दोघांच्याही जीवाला धोका निर्माण करू शकतो. प्रत्येक नागरिकाने अशा व्यापाराची माहिती मिळताच तत्काळ तक्रार करावी, जेणेकरून शोषण आणि मानव तस्करीला सुरुवातीच्या टप्यातच आळा घालता येईल.