नवीन गाडी : काझीपेठ - बल्लारपूर - चंद्रपूर - पुणे रेल्वेचा प्रस्ताव लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी नुकतीच नवी दिल्ली येथील रेल्वे भवनात केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेतली. यावेळी रेल्वे सुविधा व रेल्वे विकासावर भर टाकणाऱ्या अनेक विषयांवर सकारात्मक चर्चा केली. त्यामध्ये काझीपेठ-बल्लारपूर-चंद्रपूर-पुणे रेल्वेगाडी सुरू करण्याचाही विषय होता. या बैठकीतील विषयांच्या यश्वस्वीतेवर लवकरच शिक्कमोर्तब होईल, असा विश्वास केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी या बैठकीनंतर व्यक्त केला. ना. अहीर म्हणाले की, आपल्या लोकसभा क्षेत्रातील लोकांना, विद्यार्थ्यांना व नोकरदार वगार्ला थेट पुणे रेल्वेगाडी देण्याचा आपला संकल्प असून त्याच्या पूर्ततेसाठी आपण प्रयत्नरत आहोत. नुकत्याच पार पडलेल्या मध्य रेल्वेच्या नागपूर रेल्वे स्थानकावरील कार्यक्रमात आपण मागणी केलेल्या रेल्वे संबंधित सूचनांबद्दल उल्लेख करीत रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी काझीपेठ - बल्लारशा - चंद्रपूर - पुणे रेल्वेबाबत सकारात्मक विचार सुरु असल्याचे स्पष्ट केले. याच पार्श्वभूमीवर आपण रेल्वेमंत्र्यांशी विशेष चर्चा केली असल्याचे सांगत लवकरच या काझीपेठ - बल्लारशा - चंद्रपूर - पुणे ही नवीन रेल्वे चंद्रपूर जिल्ह्यातील जनतेच्या सेवेत समर्पित करू, अशी ग्वाही यावेळी ना. अहीर यांनी दिली. या बैठकीतून बल्लारपूर रेल्वे पीट लाईनचा विस्तार करण्यात यावा आणि बल्लारपूर - नागपूरकरिता शटल ट्रेनसाठीसुद्धा चर्चा झाली. केंद्र सरकार व राज्य सरकार आज रेल्वे, रस्ते, वीज, सिंचन, रोजगार, औषधे यासारख्या मूलभूत मुख्य सोयी - सुविधा पुरविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत आहे. जनतेला त्याचा लाभ होत आहे. तसेच नवीन काझीपेठ - पुणे ही रेल्वेगाडी विदभातील जनतेच्या सेवेत महत्त्वाचे योगदान ठरेल, असा विश्वास ना. अहीर यांनी व्यक्त केला.
हंसराज अहीर यांची रेल्वेमंत्र्यांशी चर्चा
By admin | Updated: May 19, 2017 01:13 IST