जिल्ह्याला भिजलेल्या धान्याचा पुरवठा

By Admin | Updated: October 1, 2015 01:18 IST2015-10-01T01:18:03+5:302015-10-01T01:18:03+5:30

अन्न सुरक्षा योजना व इतर योजनेच्या माध्यमातून शिधापत्रिकाधारकांना शासनाकडून धान्य वितरीत केले जाते.

Grains supplied to the district | जिल्ह्याला भिजलेल्या धान्याचा पुरवठा

जिल्ह्याला भिजलेल्या धान्याचा पुरवठा

माल उचलण्यास प्रशासनाचा नकार : धान्यासाठी करावी लागणार प्रतीक्षा
चंद्रपूर : अन्न सुरक्षा योजना व इतर योजनेच्या माध्यमातून शिधापत्रिकाधारकांना शासनाकडून धान्य वितरीत केले जाते. यासाठी आॅक्टोबर महिन्याचे शेकडो क्विंटल धान्य जिल्हा प्रशासनाला उपलब्ध झाले आहे. मात्र हे धान्य पावसाने भिजले असून अत्यंत निकृष्ठ दर्जाचे आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने हे धान्य उचलण्यास नकार दिल्याची माहिती हाती आली आहे.
निकृष्ठ दर्जाचे धान्य गरिबांना वितरीत करून आक्रोश ओढवून घेण्यापेक्षा चांगल्या दर्जाचे धान्य पुरवठा करा, तेव्हाच धान्याची उचल केली जाईल, असा पवित्रा जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे चांगल्या दर्जाचे धान्य मिळण्याला आणखी काही दिवस लागण्याची शक्यता असून गरिबांना धान्यासाठी प्रतीक्षा करावी लागण्याची पाळी आली आहे.
राज्य शासन दर महिन्याला जिल्हा प्रशासनाच्या मागणीप्रमाणे धान्याचे नियतन मंजूर करत असते. जिल्हा प्रशासनाच्या मागणीनुसार आॅक्टोबर महिन्याचे धान्य नियतन मंजूर करून जिल्हा प्रशासनाला धान्य पुरवठा करण्यात आले. पुरवठा करण्यात आलेले धान्य हे पंजाब राज्यातून आलेला असून सर्व धान्य पावसात भिजलेला आहे.
दहा ते पंधरा दिवसांपुर्वी राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस झाला. या पावसात हे धान्य भिजून खराब झाले आहे. धान्याची खराब वास येत असल्याने जिल्हा पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी धान्याची चौकशी करून माल उचलण्यास स्पष्ठ नकार दिल्याची माहिती आहे. पुरवठा करण्यात आलेले धान्य वखार महामंडळाच्या गोदामात असून हे धान्य शासनाला परत पाठवून चांगल्या दर्जाचे धान्य पुरवठा करा, तरच धान्याची उचल करून शिधापत्रिकाधारकांना वितरीत केला जाईल, असा दम वखार महामंडळाच्या अधिकाऱ्यांना पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिल्याची माहिती आहे. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Grains supplied to the district