मौजा आवंढा, कचराळा, गुंजाळा तसेच सायवन या गावच्या शेतजमिनी, गावठाणातील घरे व जागा चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राच्या राख साठवणीच्या कामाकरिता ३० ते ३५ वर्षांपूर्वी संपादित करण्यात आली. या गावांचे पुनर्वसन मौजा घोडपेठ येथे करण्यात आले.
मौजा सायवन हे गाव पूर्णपणे प्रकल्पग्रस्त व पुनर्वसित असून, घोडपेठ येथून दोन किमी अंतरावर आहे. मागील ३० ते ३५ वर्षांपासून घोडपेठ ग्रामपंचायतीच्या कोणत्याही प्रकारच्या स्थानिक विकास निधीचा उपयोग करून सायवन येथे विकासकामे करण्यात आलेली नाहीत. सायवन येथे अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीची ९० टक्के लोकसंख्या असतानासुद्धा घोडपेठ ग्रामपंचायतीतर्फे दलित वस्ती विकास निधी अंतर्गत कामे करण्यात आलेली नाहीत.
पुनर्वसित सायवन गावातील थोडीफार कामे ही मागील १५ वर्षांअगोदर खनिज विकास निधी व वेकोली ऊर्जाग्रामच्या माध्यमातून करण्यात आलेली आहेत, अशी खंतही निवेदनाद्वारे व्यक्त करण्यात आलेली आहे.
त्यामुळे मौजा सायवन या गावाला महसूल गाव घोषित करून स्वतंत्र गावठाणचा दर्जा द्यावा व मौजा सायवन, आवंढा, कचराळा, गुंजाळा या गावच्या पुनर्वसितांना भूखंडांचे वाटप करावे, अशी मागणी विदर्भ प्रकल्पग्रस्त संघटनेतर्फे करण्यात आली आहे. यावेळी विदर्भ प्रकल्पग्रस्त संघटनेचे अध्यक्ष संजय गायकवाड, सचिव सुधीर गेडाम, नंदकिशोर रायपुरे, मंगेश रायपुरे, सूरज रामटेके, दर्शन गेडाम, भूषण गेडाम उपस्थित होते.
टीप : फोटो आहे