गायमुखचा अव्याहत वाहणारा झरा अचानक बंद!

By राजेश भोजेकर | Published: January 23, 2024 11:54 AM2024-01-23T11:54:16+5:302024-01-23T11:55:52+5:30

जिल्ह्यातील आणि पंचक्रोशीतील भाविक विशेषतः याठिकाणी शनिवारी आणि सोमवारी भेट देऊन मनोभावे पूजा अर्चा करीत असतात.

Gaymukh's uninterrupted spring suddenly closed! | गायमुखचा अव्याहत वाहणारा झरा अचानक बंद!

गायमुखचा अव्याहत वाहणारा झरा अचानक बंद!

चंद्रपूर : नागभीड तालुक्यातील गायमुख येथे अनादिकाळापासून अव्याहत वाहणारा झरा अचानक बंद झाल्याने भाविकांमध्ये खळबळ उडाली आहे. झालेला प्रकार पाहण्यासाठी मंगळवारी सकाळपासूनच भाविक गर्दी करीत आहेत.
      
नागभीड तालुक्यातील गायमुख येथे जंगल व्याप्त परिसरात एका टेकडीतून अनादिकाळापासून पाण्याचा एक झरा अव्याहत वाहत आहे. या ठिकाणी गोमुख बसविण्यात आला आहे. या ठिकाणी जागृत हनुमानाचे मंदिरही आहे. जिल्ह्यातील आणि पंचक्रोशीतील भाविक विशेषतः याठिकाणी शनिवारी आणि सोमवारी भेट देऊन मनोभावे पूजा अर्चा करीत असतात. दरवर्षी मकर संक्रांतीला येथे मोठी यात्राही भरते. शासनाने या ठिकाणास पर्यटन स्थळाचा दर्जाही दिला आहे. याच वर्षी या ठिकाणी बरीच विकास कामे करण्यात आली.
          
अगदी सोमवारपर्यंत हा झरा अव्याहत सुरू होता. मात्र मंगळवारी सकाळी हा झरा अचानक बंद झाल्याचे दिसून आले. लोकमत प्रतिनिधीने या ठिकाणी भेट दिली असता भाविकांनी चांगलीच गर्दी केली होती. प्रत्येकांकडून झालेल्या प्रकाराबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते.

------------------------------

रात्री बारा वाजताच्या सुमारास जय श्रीराम अशा एक दोन लोकांच्या घोषणा ऐकू आल्या. भाविक आंघोळीसाठी आले असतील म्हणून उठलो, तर पाण्याचा झरा बंद असल्याचे दिसून आले. मंगळवारी सकाळी घडलेल्या प्रकाराची देवस्थानच्या व्यवस्थापकांना माहिती दिली.
- श्रावण धोंडूजी राऊत, पुजारी, गायमुख देवस्थान.

झरा हा पाण्याचा प्रवाह आहे. गायमुख येथील झरा वाहने बंद झाला याला कुठलीही दैवी शक्ती कारणीभूत नाही.भुगर्भात होणाऱ्या हालचालींवर अवलंबून असलेली शक्ती आहे. आजूबाजूच्या परिसरात पाण्याचा निचरा झाल्याने, किंवा पाण्याची पातळी खोल गेल्याने सुद्धा याचा झऱ्यावर परिणाम झाला असावा. कदाचित कालांतराने हा झाला पुन्हा वाहने सुरू होण्याची ही शक्यता नाकारता येत नाही.
- प्रा. डॉ. रवी रणदिवे, भूगोल विभाग प्रमुख, गो. वा. महाविद्यालय, नागभीड.

Web Title: Gaymukh's uninterrupted spring suddenly closed!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.