कुणबी समाज मंडळाच्या अभ्यासिकेसाठी ५० लाखाचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 04:15 IST2020-12-28T04:15:10+5:302020-12-28T04:15:10+5:30

किशोर जोरगेवार : कुणबी समाजाच्या उपवर-वधू परिचय मेळाव्याचा समारोप चंद्रपूर : विवाह भारतामध्ये संस्कार आणि विदेशामध्ये करार आहे. विवाहानंतर ...

Fund of Rs. 50 lakhs for study of Kunbi Samaj Mandal | कुणबी समाज मंडळाच्या अभ्यासिकेसाठी ५० लाखाचा निधी

कुणबी समाज मंडळाच्या अभ्यासिकेसाठी ५० लाखाचा निधी

किशोर जोरगेवार : कुणबी समाजाच्या उपवर-वधू परिचय मेळाव्याचा समारोप

चंद्रपूर : विवाह भारतामध्ये संस्कार आणि विदेशामध्ये करार आहे. विवाहानंतर जीवनात मोठे बदल घडतात. मानसाच्या जीवनात परिवर्तन लग्नानंतर होते. त्यानंतरच खरा भाग्योदय निर्माण होते. कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा कुणबी समाजाने वधुवर परिचय मेळावा आयोजित करून पालकांची समस्या सोडविली. कुणबी समाजाच्या पाठिशी आपण सदैव असून समाजातील विद्यार्थ्यांना अभ्यासिकेसाठी ५० लाख रुपये रुपये देण्याची घोषणा आमदार किशोर जोरगेवार यांनी केली.

कुणबी समाज मंडळ चंद्रपूर आणि मध्यवर्ती धनोजे कुणबी समाजपुरस्कृत राज्यस्तरीय त्रीदिवसीय ऑनलाइन उपवधू-वर परिचय मेळाव्याचा समारोप रविवारी कुणबी समाज मंदिर येथे पार पडला. या समारोपीय सत्रात आमदार किशोर जोरगेवार प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. पुरुषोत्तम सातपुते, प्रमुख पाहुणे म्हणून विधानसभेचे माजी उपसभापती अ‍ॅड. मोरेश्वरराव टेमुर्डे, भाजप जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, मनपा गटनेते डॉ. सुरेश महाकुलकर, कृउबासचे सभापती दिनेश चोखारे, नगरसेवक देवानंद वाढई, नगरसेविका सुनिता लोढीया, डॉ. अभिलाषा गावतुरे आदींची उपस्थिती होती.

जोरगेवार म्हणाले, कुणबी समाज हा सामाजिक उपक्रमात समाज बांधवांचे प्रबोधन करणारा समाज असून, याचा मोठा फायदा समाजातील युवा पिढीला होणार आहे. या समाजाच्या वतीने दरवर्षी आयोजित होत असलेल्या उपवर-वधू परिचय मेळाव्यातून पालकांना कमी वेळ खर्च करुन उत्तम स्थळ शोधणे शक्य होत आहे. सुसंस्कृत समाजासाठीही असे आयोजन काळाची गरज आहे. कुणबी समाजाने आयोजित केलेला शेतकरी मेळावा, परिचय मेळावा कौतुकास्पद आहे.

यावेळी जेईईमध्ये चांगले गुण घेऊन उत्तीर्ण झाल्याबद्दल शुभम डाखरे, सुरज डाखरे, केतन जुनघरे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. उपस्थित मान्यवरांचीही समायोचित भाषणे झाली. यावेळी उपवर-उपवधुंनी परिचय दिला. या ऑनलाइन मेळाव्यासाठी विजय मुसळे यांचे विशेष योगदान लाभले. संचालन प्रा. नामदेव मोरे यांनी, तर आभार विनायक धोटे यांनी मानले.

बाॅक्स

पांदन रस्त्यांची समस्या सोडविण्याची मागणी

कुणबी समाज हा मुळातच शेतकरी कुटुंबातील आहे. आजही शेती हाच व्यवसाय आहे. मात्र जिल्ह्यातील बहुतांश गावातील पांदन रस्ते अतीशय दुर्लक्षित आहे. त्यामुळे चिखलातून शेतकऱ्यांना शेतात जावे लागते. या शेतकऱ्यांना दिलासा म्हणून पांदन रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी यावेळी समाजाचे अध्यक्ष ॲड. पुरुषोत्तम सातपुते यांनी केली. या मागणीवरही विचार करण्यात येणार असल्याचे उपस्थितांनी यावेळी सांगितले.

Web Title: Fund of Rs. 50 lakhs for study of Kunbi Samaj Mandal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.