राज्यातील ७५ हजार विद्यार्थ्यांना मोफत व्याघ्र सफारी; स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2023 20:42 IST2023-02-23T20:41:46+5:302023-02-23T20:42:16+5:30
Chandrapur News जंगलाप्रती प्रेम निर्माण व्हावे. वन्यप्राण्यांची अभ्यासपूर्ण माहिती व्हावी, यासाठी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त राज्यातील पाच व्याघ्र प्रकल्पांत ७५ हजार शाळकरी मुलांना मोफत व्याघ्र सफारी घडवणार आहे.

राज्यातील ७५ हजार विद्यार्थ्यांना मोफत व्याघ्र सफारी; स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त उपक्रम
चंद्रपूर : जंगलाप्रती प्रेम निर्माण व्हावे. वन्यप्राण्यांची अभ्यासपूर्ण माहिती व्हावी, यासाठी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त राज्यातील पाच व्याघ्र प्रकल्पांत ७५ हजार शाळकरी मुलांना मोफत व्याघ्र सफारी घडवणार आहे. याची लवकरच वन विभाग अधिकृत घोषणा करतील, अशी माहिती राज्याचे वन, सांस्कृतीक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गुरुवारी येथे पत्रकारांशी बोलताना दिली. ताडोबा, नवेगाव नागझिरा, उमरेड-कऱ्हांडला, मेळघाट या व्याघ्र प्रकल्पात विद्यार्थ्यांना ही सफारी घडवून आणणार असल्याचेही म्हणाले.
जगात आजघडीला केवळ १४ देशांमध्ये वाघ शिल्लक आहेत. त्यात भारतात सर्वाधिक वाघ महाराष्ट्रात आहेत. त्यातही एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात सर्वाधिक २०३ वाघ आहेत, असे सांगत विद्यार्थी दशेपासूनच शाळकरी मुलांमध्ये जंगलांप्रती प्रेम, आपुलकी निर्माण होऊन वन्यजीवांची अभ्यासपूर्ण माहिती व्हावी, यासाठी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त ७५ हजार शाळकरी विद्यार्थ्यांना मोफत जंगल सफारी घडवून आणणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
सफारीदरम्यान, विद्यार्थ्यांना एक अभ्यासपूर्ण जंगल, वने व वन्यप्राण्यांवर आधारित पुस्तिका, सोबतच टी-शर्ट, पेन, नोटबुक, चहा, नाष्टा व इतर साहित्य पुरवण्यात येणार आहे. या योजनेचा आराखडा जवळपास तयार झालेला आहे. लवकरच याबाबतची अधिकृत घोषणा करणार आहे, असेही म्हणाले. यापूर्वी ही योजना केवळ चंद्रपूर जिल्ह्यातील जंगलालगतच्या शाळकरी विद्यार्थी व जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी होती.