चंद्रपूर जिल्ह्यात एकाच दिवशी चार अपघात; चिमुकलीसह सात जण ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 15:46 IST2026-01-16T15:46:09+5:302026-01-16T15:46:50+5:30
Chandrapur : चंद्रपूर जिल्ह्यात गुरुवारी एका दिवसात ब्रह्मपुरी, बल्लारपूर, वरोरा आणि मूल परिसरात घडलेल्या चार भीषण अपघातांनी जिल्ह्यावर शोककळा पसरवली.

Four accidents in Chandrapur district on a single day; Seven people including a child died
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात गुरुवारी एका दिवसात ब्रह्मपुरी, बल्लारपूर, वरोरा आणि मूल परिसरात घडलेल्या चार भीषण अपघातांनी जिल्ह्यावर शोककळा पसरवली. या वेगवेगळ्या घटनांत पाच वर्षाच्या चिमुकलीसह सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर सहा जण गंभीर जखमी झाले. अचानक ओढावलेल्या या दुर्घटनांनी अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. बल्लारपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आसेगाव-चिचपल्ली फाट्याजवळ पहिली दुर्घटना घडली. उपचारासाठी चंद्रपूरकडे दुचाकीने येत असताना अरुण देविसाद पिपरे (३५) पत्नी व तीन वर्षाच्या मुलासह रस्त्याच्या कडेला थांबले होते. याचवेळी भरधाव क्रेनने धडक दिल्याने अरुण पिपरे यांचा जागीच मृत्यू झाला. पत्नी काजल पिपरे व चिमुकला अश्विक पिपरे (३) गंभीर जखमी झाले. अपघातानंतर क्रेनचालक पसार झाला. पोलिसांनी बीएनएस २८१, १०६ (१), १२५ (अ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
गोगाव-सायगाव मार्गावर ट्रॅक्टर पलटी
ब्रह्मपुरी : लाकूड कटाईसाठी तळोधी येथे गेलेले सात मजूर परत येत असताना गोगाव-सायगाव मार्गावर ट्रॅक्टर एक्सल तुटल्याने ट्रॅक्टर सहा ते सात फूट खोल खड्ड्यात पलटी झाला. या अपघातात प्रवीण प्रकाश भोयर (३०) व शिवाजी बळीराम दोडके (५०) यांचा जागीच मृत्यू झाला. ब्रह्मदास भजगवळी व नीलकंठ जरादे हे गंभीर जखमी, तर दोघे किरकोळ जखमी झाले.
अवैध रेती वाहतुकीचा बळी; मजूर ठार
वरोरा : शेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वायगाव जंगल परिसरात अवैध रेती वाहतुकीदरम्यान ट्रॅक्टर चालकाने वनविभागाची गाडी पाहताच रेती खाली टाकली. यावेळी रेतीवर झोपलेला प्रवीण वसंत दडमल (३५) रेतीखाली दबला गेला. त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अवैध वाहतुकीमुळे पुन्हा एकदा एका कुटुंबाचा आधार हिरावला गेला आहे.
वाहनाने पाच वर्षीय चिमुकलीला चिरडले; संतप्त ग्रामस्थांचा रास्ता राको
मूल : खेडीवरून जुनासुर्लाकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या टाटा एस गाडीने रस्त्याच्या कडेला खेळत असलेल्या चिमुकलीला चिरडल्याने चिमुकलीचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना भवराळा येथे गुरुवारी (दि.१५) सकाळी ८:३० वाजता दरम्यान घडली. रुद्रप्रिया सोमेश्वर सरपाते (वय ५, रा. भवराळा) असे मृत चिमुकलीचे नाव आहे. या घटनेमुळे गावात संतप्त नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन करून तत्काळ गतिरोधक करण्यात यावे, अशी मागणी केली. भवराळा येथील सोमेश्वर सरपाते यांची मुलगी रुद्रप्रिया सकाळी खेडी जुनासुर्ला मार्गावरील भवराळा गावात रस्त्याच्या कडेला खेळत होती.