चंद्रपूरचे माजी आमदार तथा ‘एन्काऊंटर’कार लोकनेते एकनाथ साळवे यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2021 07:45 IST2021-03-14T07:38:39+5:302021-03-14T07:45:39+5:30
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मा. सा. कन्नमवार त्यांचे राजकीय गुरू होते. नक्षल चळवळीशी संबंधित त्यांची ‘एन्काऊंटर’ कादंबरी प्रचंड गाजली. १९६७ ते १९७२ आणि १९७२ ते १९७८ असे दहा वर्षे त्यांनी चंद्रपूर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. (Eknath Salve)

चंद्रपूरचे माजी आमदार तथा ‘एन्काऊंटर’कार लोकनेते एकनाथ साळवे यांचे निधन
चंद्रपूर : चंद्रपूरचे माजी आमदार, ‘एन्काऊंटर’कार, ज्येष्ठ समाजसेवक ॲड. एकनाथ पांडुरंग साळवे (Eknath Salve) यांचे शनिवारी दुपारी १.२० वाजता वृद्धापकाळाने येथील बापटनगरातील निवासस्थानी निधन झाले. ते ९१ वर्षांचे होते. त्यांनी मृत्यूपूर्वी व्यक्त केलेल्या इच्छेनुसार बल्लारपूर-राजुरा मार्गावरील बामणी येथून रविवारी सकाळी ११ वाजता त्यांची अंत्ययात्रा निघेल. वर्धा नदीवरील पुलाजवळ त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी शालिनी, मुलगा ॲड. जयंत साळवे व तीन मुलींसह स्नुषा, जावई, नातवंडे असा बराच मोठा आप्त परिवार आहे. (Former Chandrapur MLA Eknath Salve passes away)
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मा. सा. कन्नमवार त्यांचे राजकीय गुरू होते. नक्षल चळवळीशी संबंधित त्यांची ‘एन्काऊंटर’ कादंबरी प्रचंड गाजली. १९६७ ते १९७२ आणि १९७२ ते १९७८ असे दहा वर्षे त्यांनी चंद्रपूर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. १९७२ मध्ये ते लंडन येथे काॅमनवेल्थ पार्लमेंट सेमिनारमध्ये सहभागी झाले होते. १९७८ पासून त्यांनी चंद्रपूर-नागपूर कोर्टात वकिली केली. टाडा कायद्याखाली निरपराध आदिवासींना गोवण्यात येत असताना ॲड. साळवे यांनी एकही रुपया न घेता त्यांना न्याय मिळवून दिला. आदिवासी, दलितांना सिंचनासाठी पाणी सत्याग्रह केला. त्यांनी १९९३ मध्ये बौद्ध धम्माचा स्वीकार केला होता.