लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : यवतमाळ आणि तेलंगणा राज्यातील आदिलाबाद जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे इसापूर व सातनाला धरणांचे शनिवारी दरवाजे उघडण्यात आले. परिणामी चंद्रपूर जिल्ह्यातील वर्धा, पैनगंगा नदीला रविवारी पूर आला असून काही मार्ग बंद झाले आहे.
या पुराचा फटका चंद्रपूर, कोरपना, बल्लारपूर तसेच राजुरा तालुक्यातील नदीकाठावरील गावांना बसण्याची शक्यता आहे. काही शेतात पुराचे पाणी शिरल्याने शेतपिकांचेही मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
रविवारी जिल्ह्यात पावसाचा जोर नसतानाही, धरणांतून सोडण्यात आलेल्या पूरस्थिती निर्माण झाली आहे. भोयेगाव पुलावरून १३ ते १४ फूट उंचीवरून पाणी वाहत होते. चंद्रपूर गडचांदूर, घुग्घुसकडे जाणाऱ्या वाहनांच्या रांगा लागल्या. पुराचा धोका लक्षात घेता प्रशासनाने नदीकाठावर बॅरिकेड लावून काही मार्ग बंद केले आहेत.