वाघाच्या हल्ल्यात आणखी एकाचा बळी, चिमूर परिसरातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2021 18:30 IST2021-12-17T18:25:46+5:302021-12-17T18:30:56+5:30
सोनेगाव (बेगडे) येथील शेतकरी शेतात गवत कापण्यासाठी गेला असता वाघाने हल्ला करून त्याला ठार केले. ही घटना शुक्रवारी उघडकीस आली असून परिसरात खळबळ उडाली आहे.

वाघाच्या हल्ल्यात आणखी एकाचा बळी, चिमूर परिसरातील घटना
चंद्रपूर : चिमूर नगरपरिषदेअंतर्गत येत असलेल्या सोनेगाव (बेगडे) येथील शेतकरी शेतात गवत कापण्यासाठी गेला असता वाघाने हल्ला करून त्याला ठार केले. ही घटना शुक्रवारी उघडकीस आली असून परिसरात खळबळ उडाली आहे.
देविदास गायकवाड (४०, रा. सोनेगाव (बेगडे) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. बुधवारी सकाळी ते शेतात गवत कापण्यासाठी गेले होते. दिवसभर घरी न परतल्याने कुटुंबीयांनी रात्री शेतात चौकशी केली. परंतु देविदास कुठेच दिसले नाहीत. दरम्यान, शुक्रवारी सकाळी शेतातच त्यांचा मृतदेह आढळला. धड शरीरापासून वेगळे झाले होते. घटनेची माहिती मिळताच वन विभाग व पोलीस प्रशासनाने घटनास्थळी जाऊन चौकशी करीत पंचनामा केला. घटनास्थळाच्या अवलोकनावरून वाघानेच त्यांच्यावर हल्ला करून ठार केल्याचे दिसून आले.
दरम्यान, पोंभुर्णा तालुक्यातही वाघ हल्ल्याची घटना समोर आली असून गुरुवारी सकाळी मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलेवर वाघाने महिलेला लोकांच्या डोळ्यादेखतच पकडून ठेवून ठार केले. तर, याच वर्षी मार्चमध्ये पोंभूर्णा तालुक्यातील चेक आष्टा येथील शेतकऱ्याला वाघाने ठार केले होते. मागच्याच महिन्यात कसरगट्टा येथील कापूस वेचण्यासाठी गेलेल्या महिलेला कविठबोळी शिवारात वाघाने ठार केले. गुरुवारी ही घटना घडली. वाघ हल्ल्याच्या घटना दररोजच्याच झाल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. वाघ आणखी किती बळी घेणार, असा संतप्त नागरिकांचा सवाल आहे.