लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना अनुदानाअभावी अर्थसाहाय्य मिळण्यास विलंब झाला होता. जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाने सातत्याने पाठपुरावा केल्याने अखेर ३ कोटी ७५ लाखांच्या निधीला मंजुरी मिळाली. जुलै २०२२ ते जानेवारी २०२५ पर्यतच्या विवाहित जोडप्यांनी अर्ज सादर केला, अशा ७५० जोडप्यांना निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. लाभार्थ्यांना अर्थसाहाय्य वितरणाची कार्यवाही सरू करण्यात आली आहे.
सामाजिक समता व समरसता निर्माण करण्याच्या दृष्टीने आंतरजातीय विवाहास प्रोत्साहनपर आर्थिक साहाय्य देण्याची योजना सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागामार्फत राबविण्यात येत आहे. जुलै २०२२ ते जानेवारी २०२५ पर्यतच्या ज्या आंतरजातीय विवाहित जोडप्यांनी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागात अर्ज सादर केला, अशा सर्व जोडप्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
अर्ज केलेल्या विवाहित जोडप्यांनी मूळ जात प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, विवाह नोंदणीचे प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, आधार कार्ड, संयुक्त बैंक खाते पासबुक, इत्यादी कागदपत्रे तपासणीसाठी मूळ कागदपत्रांसह समाजकल्याण विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर येथे शासकीय सुट्या वगळता २८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत प्रत्यक्ष उपस्थित राहावे. नियमानुसार सर्व कागदपत्रांची पूर्तता करावी, असे आवाहन समाजकल्याण अधिकारी धनंजय साळवे यांनी दिली.
"समाजातील जातीभेद व असमानतेची दरी दूर होऊन समाज एकसंघ व्हावा म्हणून शासनाकडून आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देत आहे. जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांनी कागदपत्रांची पूर्तता करून योजनेचा लाभ घ्यावा."- विवेक जॉन्सन, मुख्य कार्यकारी अधिकारी, चंद्रपूर