दारू तस्करीत कॉँग्रेस पदाधिकारी सापडल्याने खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 00:57 IST2019-06-07T00:56:22+5:302019-06-07T00:57:09+5:30
वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूरच्या पोलिसांनी चंद्रपूर कॉँग्रेसचा महासचिव संदीप सिडाम याला दारूतस्करी प्रकरणात अटक केल्याने खळबळ उडाली आहे. लोकसभा निवडणुकीत चंद्रपूरच्या दारूबंदीवरून कॉँग्रेसने मोठ्या प्रमाणावर आकांडतांडव निर्माण केले होते.

दारू तस्करीत कॉँग्रेस पदाधिकारी सापडल्याने खळबळ
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूरच्या पोलिसांनी चंद्रपूर कॉँग्रेसचा महासचिव संदीप सिडाम याला दारूतस्करी प्रकरणात अटक केल्याने खळबळ उडाली आहे. लोकसभा निवडणुकीत चंद्रपूरच्या दारूबंदीवरून कॉँग्रेसने मोठ्या प्रमाणावर आकांडतांडव निर्माण केले होते. आता काँग्रेस पदाधिकारीच दारू तस्करीत अडकल्याने सोशल मीडियावर चांगलाच रोष व्यक्त केला जात आहे.
१ जून रोजी समुद्रपूर पोलिसांनी आलिशान गाडीतून दारूची तस्करी होत असताना सदर वाहन जाम चौरस्त्यावर पकडले. या प्रकरणात कॉँग्रेसचा महासचिव असलेल्या संदीप महादेव सिडाम रा. तुकूम तलाव, चंद्रपूर याच्यासह चंद्रकांत शांताराम पवार व ब्रिजेश दामोधर तामगाडगे यालाही अटक करण्यात आली. त्यांच्याकडून आठ लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. भाजपला बदनाम करण्यासाठी कॉँग्रेसने दारूबंदीच्या मुद्याचे भांडवल करण्याची भूमिका निवडणूक काळात घेतली होती. त्यानंतर कॉँग्रेसचा पदाधिकारी दारू तस्करीच्या प्रकरणात सापडला आणि हा प्रकार सोशल मीडियावर चांगलाच वायरल झाला. त्यामुळे कॉँग्रेसची आता मोठी गोची झाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात कॉँग्रेस वारंवार दारूबंदी हटविण्याबाबत मागणी करीत आहे. या पार्श्वभूमीवर कॉँग्रेसचा पदाधिकारीच दारू तस्करी करताना सापडल्याने राजकीय क्षेत्रातही खळबळ उडाली आहे. सदर काँग्रेस पदाधिकाऱ्याची काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करणार असल्याचे आ. विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.