फोटो : ब्रह्मपुरी आगारात इंधनाअभावी उभ्या असलेल्या बसेस
ब्रह्मपुरी : येथील बस आगारात पहिल्यांदा वेळेवर इंधन उपलब्ध न झाल्याने ब्रह्मपुरी बस आगारातील लालपरीची चाके इंधनाअभावी २४ तास थांबली. यामुळे व्यवस्थापनाची चांगलीच तारांबळ उडाली होती.
ब्रह्मपुरी बस आगाराला गडचिरोली येथील विभागीय कार्यालयाकडून दोन-तीन दिवसांसाठी १२ ते १३ हजार लिटर इंधन पुरविले जाते. अशाच प्रकारे ब्रह्मपुरी बस आगार व्यवस्थापनाने गुरुवारी चार हजार लिटर इंधनाची ऑर्डर इंडियन ऑइल कॉर्पोरेशन नागपूर यांच्याकडे केली होती. त्यानुसार शुक्रवारी सकाळी इंधन भरून टँकर नागपूर येथून ब्रह्मपुरीकडे यायला निघाला. मात्र, वाटेत नागपूर जवळील पाचगावजवळ इंधन घेऊन येणाऱ्या टँकरचे इंजिन फेल झाले. त्यामुळे हा टँकर वेळेवर ब्रह्मपुरी बस आगारात पोहोचू शकला नाही. त्यामुळे शुक्रवारी तीन वाजल्यापासून ब्रह्मपुरी बस आगारातील लालपरीची चाके इंधन नसल्याने थांबली होती. यामुळे बाहेरगावच्या प्रवाशांचे, तसेच विद्यार्थ्यांचे चांगलेच हाल झाले.
बॉक्स
दुसरा टँकर बोलाविला
इंधन घेऊन येणारा टँकर नादुरुस्त झाल्याची माहिती व्यवस्थापक भाग्यश्री कोडापे यांना मिळाली असता त्यांनी ताबडतोब दुसरा टँकर बुक केला; मात्र तोपर्यंत बराच वेळ झाला असल्याने दुसरा इंधन टँकर शनिवारी दुपारी दोन वाजता ब्रह्मपुरी बस आगारात पोहोचला आणि दुपारी तीन वाजल्यापासून ब्रह्मपुरी बस आगारातील लालपरीची चाके धावायला लागली.
कोट
विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी मालवाहतूक बसमधून इंधन काढून मानव विकासच्या बसमध्ये इंधन टाकून विद्यार्थ्यांना त्यांच्या गावापर्यंत सोडण्यात आले. तसेच प्रवाशांचीसुद्धा गैरसोय होऊ नये यासाठी दर एक-एक तासांनी चंद्रपूरकरिता बसेस सोडण्यात आल्या. त्यामुळे काही प्रमाणात प्रवाशांची गैरसोय टाळता आली.
- भाग्यश्री कोडापे, आगार व्यवस्थापक, ब्रह्मपुरी