वाहनचालकांनो, ही जीवघेणी स्पर्धा कुणासाठी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2022 05:00 IST2022-01-16T05:00:00+5:302022-01-16T05:00:43+5:30
रस्त्याचे नियम सर्वांसाठी सारखेच असतात. एकाने ते पाळले नाही तर होत्याचे नव्हते होते. मग स्वत:चा जीव मुठीत घेऊन रस्ते नियम कुणासाठी आणि का मोडतो? ही बाब प्रत्येक वाहनचालकांना आत्मचिंतन करायला लावणारी आहे. एसटी बस कर्मचाऱ्यांच्या संपामुळे खासगी प्रवासी वाहने प्रवाशांना जनावरांसारखे कोंबून धावत आहे. ते वाहन नियोजित स्थळी पोहचेपर्यंत जिवात जीव नसतो.

वाहनचालकांनो, ही जीवघेणी स्पर्धा कुणासाठी?
राजेश भोजेकर
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपूर-नागपूर या वर्दळीच्या मार्गावर शुक्रवारी झालेला भीषण अपघात वाहनचालकांसाठी धडा आहे. ज्याची चूक होती आणि ज्याची चूक नव्हती अशा दोघांचाही मृत्यू झाला. या अपघाताने रस्ता सुरक्षेवरच अनेक प्रश्न लावले आहे.
रस्त्याचे नियम सर्वांसाठी सारखेच असतात. एकाने ते पाळले नाही तर होत्याचे नव्हते होते. मग स्वत:चा जीव मुठीत घेऊन रस्ते नियम कुणासाठी आणि का मोडतो? ही बाब प्रत्येक वाहनचालकांना आत्मचिंतन करायला लावणारी आहे. एसटी बस कर्मचाऱ्यांच्या संपामुळे खासगी प्रवासी वाहने प्रवाशांना जनावरांसारखे कोंबून धावत आहे. ते वाहन नियोजित स्थळी पोहचेपर्यंत जिवात जीव नसतो. याची जाणीव त्या वाहनाच्या चालकाला नसेल आणि तो आपल्याच तालात वाहन हाकत असेल तर हा जीवघेणा खेळ कधीच थांबणार नाही. त्या अपघातातून थोडक्यात बचावलेल्या एका प्रवाशाने जे सांगितले हे भयावह आहे. ट्रॅव्हल्सचा जामनंतरचा प्रवास थरकाप उडविणारा होता. चालक मोठमोठ्याने गाणे वाजवत होता. तो मागे वळून प्रवाशांसोबत गप्पाही मारत होता. मोबाइलवरही बोलायचा. आनंदवन चौकानंतर मोबाइलवर संभाषण सुरू असतानाच घात झाला. लगेच ट्रक आडवा आला. यात दोन्ही चालकांचा जीव गेला. तो ट्रक नसता तर मृतांचा आकडा वाढला असता, असे तो म्हणाला. रस्त्याने शेकडो वाहने धावत असतात. एकाची चूक अनेकांना भोगावी लागते. त्याचे परिणाम दूरगामी असतात. स्वत:चा जीव नेहमी धोक्यातच असतो. हे प्रत्येक चालकाने ध्यानात ठेवण्यासारखे आहे. प्रवासी वाहनचालक असे बेजबाबदारपणे वाहन का हाकतात? याला त्या वाहनाचे मालकही तेवढेच जबाबदार आहे. पैशाच्या हव्यासापोटी त्यांनीच ही जीवघेणी स्पर्धा सुरू केलेली असते. पुढच्या थांब्यावरील प्रवासी मिळविण्यासाठी ही स्पर्धा असते. यामध्ये जीव जाईल तो चालकाचा आणि प्रवाशांचा, मालक मात्र सुखरूप असतो. विम्याच्या आधारे दुसरे वाहन मिळेल, पण गेलेला जीव परत मिळत नाही. मग चालकाने का म्हणून ही जीवघेणी स्पर्धा करावी? प्रत्येक दिवस सारखा नसतो. हे या अपघातातून शिकले तर मिळविले.
ट्रॅव्हल्सच्या वेगावर नियंत्रण ठेवा : खासदार
चंद्रपूर : एसटी बस दोन महिन्यांपासून बंद असल्याने अधिकचा नफा कमावण्याच्या हेतूने प्रवाशांचा जीव वाहनचालक टांगणीला लावत आहेत. जिल्ह्यातून धावणाऱ्या ट्रॅव्हल्सच्या वेगावर नियंत्रण ठेवा, असे निर्देश देणारे पत्र खासदार बाळू धानोरकर यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे व सहायक पोलीस निरीक्षक, महामार्ग पोलीस केंद्र खैरकर, पोलीस निरीक्षक वाहतूक नियंत्रण शाखा चंद्रपूर यांना दिले. चंद्रपूर जिल्ह्यातून चंद्रपूर - नागपूर, चंद्रपूर - गडचिरोली, चंद्रपूर- ब्रह्मपुरी तसेच चंद्रपूर-पुणे मार्गावर जाणाऱ्या अनेक ट्रॅव्हल्स कार्यरत आहेत. ट्रॅव्हल्सच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी तत्काळ उपायोजना कराव्यात, अनियंत्रित वेगासाठी किती खासगी ट्रॅव्हल्सवर कारवाई केली याची माहिती सादर करावी, अशी सूचना खासदार धानोरकर यांनी केली.