सुरक्षिततेच्या सूचनांकडे दुर्लक्ष, चालकावर गुन्हा दाखल; चंद्रपुरातील भीषण अपघातात चार महिला ठार तर पाच जण जखमी
By राजेश भोजेकर | Updated: December 25, 2025 12:48 IST2025-12-25T12:46:52+5:302025-12-25T12:48:12+5:30
मारोती अर्टिका पुलाखाली कोसळली; चार महिला ठार, पाच जखमी : सोंडो गावाजवळ पहाटे दीड वाजताची भीषण दुर्घटना

Driver booked for ignoring safety instructions; Four women killed, five injured in horrific accident in Chandrapur
चंद्रपूर : नागपूरहून कागजनगरकडे जात असलेली मारोती सुझुकी अर्टिका कार पुलाखाली कोसळून झालेल्या भीषण अपघातात चार महिलांचा जागीच मृत्यू झाला, तर पाच जण गंभीर जखमी झाले. ही घटना बुधवारी (२५ डिसेंबर) पहाटे सुमारे दीड वाजताच्या सुमारास राजुरा तालुक्यातील सोंडो गावाजवळ घडली.
टीएस ०२ ईएन ५५४४ क्रमांकाची अर्टिका कार सोंडो गावाजवळील वळणाचा अंदाज न आल्याने चालकाचा ताबा सुटला आणि गाडी थेट पुलाखाली कोसळली. या अपघातात सलमा बैग, उकसा सकरीन, अब्जल बैग आणि सहिरा बेगम यांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये आईसह मुलीचा समावेश आहे.
अपघातात चालक अब्दुल रहमान (वय २८), नुसरत बेगम, नजहत बेगम, साहिल निशा आणि अब्दुल अरहान हे पाच जण जखमी झाले असून त्यांना चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोघांना व्हेंटिलेटरवर ठेवले आहे. अन्य जखमींची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येते.
कार्यक्रम आटोपून नागपूरहून परत येत असताना चालकाला डुलकी लागल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे. या प्रकरणी चालक अब्दुल रहमान याच्यावर कलम २८१, २२५ (बी), १०६ (१) बीएनएस तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ठाणेदार सुमित परतेकी करीत आहेत.
रात्रीच्या प्रवासादरम्यान वेग आणि निष्काळजीपणामुळे अशा घटना वारंवार घडत असून, पुन्हा एकदा सुरक्षिततेच्या सूचनांकडे दुर्लक्ष झाल्याने चार निष्पाप जीव गेले.